कोल्हापुरातील पुरग्रस्त भागांना रोहित पवारांची भेट; परिस्थितीचा आढावा घेत, पूरग्रस्तांना दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 06:37 PM2021-07-30T18:37:05+5:302021-07-30T18:37:49+5:30

एका ठिकाणी पाण्यामुळं रस्त्यावर साठलेला गाळ काढण्याचं काम काही कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामार्फत सुरू होतं, त्यांनाही मदत केली. (Rohit Pawar Kolhapur)

MLA Rohit Pawar's visit to flood-hit areas in Kolhapur Reviewing the situation | कोल्हापुरातील पुरग्रस्त भागांना रोहित पवारांची भेट; परिस्थितीचा आढावा घेत, पूरग्रस्तांना दिला धीर

कोल्हापुरातील पुरग्रस्त भागांना रोहित पवारांची भेट; परिस्थितीचा आढावा घेत, पूरग्रस्तांना दिला धीर

googlenewsNext


कोल्हापूर- गेल्या आठवड्यात राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळं कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत आणि परिस्थितीचा आढावा घेत पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना धीर दिला. तसंच, एका ठिकाणी पाण्यामुळं रस्त्यावर साठलेला गाळ काढण्याचं काम काही कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामार्फत सुरू होतं, त्यांनाही मदत केली. (MLA Rohit Pawar's visit to flood-hit areas in Kolhapur, Reviewing the situation)

कोल्हापूर भेटीनंतर रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे, त्यात ते म्हणतात, "काल कोल्हापूर शहरात पुराचं पाणी घुसलेल्या भागात भेट दिली. सिद्धार्थनगर (सत्याही गल्ली), कुंभारवाडी (बापट कॅम्प), बाचणी (ता. कागल) इथं पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सिद्धार्थनगर परिसर हा काहीसा सखल भाग असल्यामुळं या भागात पुराचं पाणी सर्वात आधी शिरतं. त्यामुळं बाजूच्या नाल्याच्या बाजूने भिंत उभारण्याची मागणी इथल्या नागरिकांशी चर्चा करत असताना त्यांनी केली. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी २०१९ च्या महापुराच्या पार्श्वभूमीवर शहरीवस्तीमध्ये पाणी शिरण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या नाल्यांची लोकसहभागातून सफाई करण्याची/गाळ काढण्याची मोहीम राबवली होती. त्याचा चांगला फायदा झाल्याचंही यावेळी लोकांनी सांगितलं."

"कुंभारवाडीत (बापट कॅम्प) प्रामुख्याने गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात. गणेशोत्सव जवळ आल्याने अनेक व्यावसायिकांनी मूर्ती तयार करून ठेवल्या होत्या. या मूर्तींचं पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही व्यावसायिकांनी गेल्या वर्षीच्या अनुभवातून त्यांच्याकडील मूर्ती उंच भागात नेऊन ठेवल्यामुळं काही प्रमाणात त्यांचं नुकसान टळलं. यावेळी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींचा तोटा, त्याला पर्यायी शाडूच्या मूर्ती आणि त्याची उपलब्धता, अशा अनेक मुद्यांवर कुंभार बांधवांशी चर्चा केली. यावेळी योगायोगाने तिथं काही कामानिमित्त उपस्थित असलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे मॅडम यांची भेट झाली. त्यांच्याकडं 'कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन, बारामती ऍग्रो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी दिलेलं मदत साहित्य सुपूर्द केलं. यावेळी पूर परिस्थितीत प्रशासनाने कशा प्रकारे बचाव आणि मदत कार्य केलं याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. हे सर्व अधिकारी इतर कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने लोकांमध्ये जाऊन चांगलं काम करत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांच्यासह आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, युवा नेते 'गोकुळ'चे संचालक नविद मुश्रीफ आणि इतर आमदार, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे सर्वजण पूरग्रस्त भागातील लोकांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. चंदगडचे आमदार राजेश पाटील हेही आपल्या भागात पुरग्रस्तांसाठी चांगलं काम करत आहेत" असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

"कागल तालुक्यातील बाचणी या गावातील पूरग्रस्त नागरिकांना भेटून धीर दिला. दूधगंगा नदीच्या काठावर हे गाव आहे. इथं शेतातून घरी येत असलेल्या जाधव कुटुंबातील एक महिला भगिनी आणि त्यांचा १३ वर्षांच्या मुलाचा तार तुटल्याने विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत झाला. घरातली दोन माणसं गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या कुटुंबाला भेटून त्यांचं सांत्वन केलं. 'गोकुळ'चे संचालक नविद मुश्रीफ यांनी या कुटुंबाला मोठा आधार दिलाय. मुश्रीफ कुटुंबाचा इथल्या लोकांना नेहमीच आधार वाटंत आलाय तो त्यांच्या या कामामुळंच. तळागाळातील लोकांशी थेट संपर्क आणि गरज लागेल तेंव्हा लोकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांचंही त्यांना खूप प्रेम मिळत आहे. बाचणीमधील इतर पुरग्रस्तांचीही भेट घेतली. इथंही लोकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालंय. ऊस हे इथलं प्रमुख पीक असून या पिकाचंही पावसामुळं नुकसान झालंय. मात्र या पुराच्या पाण्यामुळं उसाला लागणाऱ्या हुमणीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, असं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं," असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, "कोल्हापुरात महापुरामध्ये लोकांना स्थलांतरित करण्यापासून त्यांच्या जेवणाची व जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याकामी काही सामाजिक संस्थांनी खूप मोठी मदत केली. आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत एका बैठकीचं आयोजन केलं होतं. कोल्हापूरच्या हितासाठी या सर्व संस्था एकत्र आल्याचं पाहून समाधान वाटलं. यावेळी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली आणि काम करत असताना आलेले विविध अनुभव त्यांनी यावेळी सांगितले."

"सांगलीमध्ये तेथील प्रशासनाकडं पुरग्रस्तांसाठी देण्यात आलेली मदत सुपूर्द केली आणि शहरातील भारतनगर, रसिक चौक, सिद्धार्थ चौक, सांगलीवाडी, औदुंबर या भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पालकमंत्री आदरणीय जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे कार्यकर्ते अत्यंत चांगलं काम करत आहेत. लॉकडाउन काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सांगली, मिरज व आसपासच्या गोरगरीब जनतेसाठी  सुरू करण्यात आलेल्या 'जयंत थाळी' या उपक्रमाचा खूप चांगला फायदा इथल्या लोकांना होत आहे. जयंत पाटील यांचा पहिल्यापासून कर्नाटक सरकारशी समन्वय आहे, त्यामुळं पुराचं योग्य प्रकारे नियोजन झालं. अलमट्टी धरणातून वेळीच मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळं पुराची तीव्रता कमी झाली. असं नियोजन करण्यात २०१९ मध्ये अपयश आल्याने सांगली जवळपास आठ दिवस पाण्यात गेली होती. पण यावेळी मात्र योग्य नियोजन करण्यात आलं, हे महाविकास आघाडी सरकारचं यश आहे," असंही रोहित यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

"औदुंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली. इथले सगळे कार्यकर्तेही खूप चांगलं काम करत आहेत. पुराच्या पाण्यामुळं रस्त्यावर साठलेला गाळ काढण्याचं काम तिथले कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामार्फत सुरू होतं, त्यांना मदत केली. यावेळी आमदार अरुण अण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ आणि युवा मित्रांसोबत बैठक झाली. या युवा मित्रांनी जमा केलेली मदत पुरग्रस्तांना दिली. पुरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतींचे काही निकष बदलण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली. ही बाब आदरणीय पवार साहेब यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवली जाईल आणि यावर सकारात्मक निर्णय होईल, असं त्यांना आश्वस्त केलं," असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Web Title: MLA Rohit Pawar's visit to flood-hit areas in Kolhapur Reviewing the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.