मनसेचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:31 AM2021-09-16T04:31:34+5:302021-09-16T04:31:34+5:30
मार्च २०२० मध्ये जगात आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे जोतिबाचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला होता. आज ...
मार्च २०२० मध्ये जगात आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे जोतिबाचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला होता. आज मंदिर बंद होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत. या दोन वर्षांत चैत्र पौर्णिमेसारख्या मोठ्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे जोतिबा डोंगरावरील पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असून, भाविकांचेदेखील धार्मिक आणि आध्यात्मिक नुकसान झाले आहे. आज महाराष्ट्रात सर्व व्यवसाय सुरू आहेत. मात्र, मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या विरोधात बुधवारी पन्हाळा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोतिबा डोंगर येथे जोतिबा मंदिरासमोरच घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. येत्या आठ दिवसांत जोतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोतिबा मंदिराचे कुलूप तोडून आंदोलन केले जाईल आणि मंदिरात महाआरती केली जाईल, असा इशारा पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे यांनी यावेळी दिला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी सचिव नायकवडी यांना मंदिर सुरू करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. जोतिबा मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी जोतिबाची आरती केली. या आरतीत ग्रामस्थ आणि भाविक सहभागी झाले होते. आजचे हे आंदोलन पन्हाळा तालुका मनसेचे सचिव लखन लादे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आजच्या या घंटानाद आंदोलनाला मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सतीश तांदळे, अमर बचाटे, सिंधूताई शिंदे, शुभांगी पाटील यांच्यासह पन्हाळा, शाहूवाडी, इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील मनसे सैनिक सहभागी झाले होते.