मोबाईल शासनाचे, मग दुरुस्ती आम्ही का करायची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:24 AM2021-09-25T04:24:25+5:302021-09-25T04:24:25+5:30
कोल्हापूर : शासनाच्या कामासाठी शासनानेच मोबाईल खरेदी केले, मग त्याची दुरुस्ती आम्ही का करायची, ...
कोल्हापूर : शासनाच्या कामासाठी शासनानेच मोबाईल खरेदी केले, मग त्याची दुरुस्ती आम्ही का करायची, असा सवाल करत विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेकडचा रस्ता अक्षरश बंद करून टाकला. तीन तास चाललेल्या आंदोलनामध्ये बाराही तालुक्यातून कर्मचारी सहभागी झाले.
कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अध्यक्ष अतुल दिघे आणि सचिव सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. महावीर उद्यानातून या मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. याच ठिकाणी आधीपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा सुरू असल्याने संपूर्ण रस्ताभर कर्मचारीच दिसत होते.
सुमारे दीड तास आंदोलन झाल्यानंतर शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांची भेट घेतली. यावेळी परत केलेल्या मोबाईलपासून ते मानधनवाढीबाबतच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रशासनाकडे जमा केलेले मोबाईल परत न्या म्हणून दबावतंत्र सुरू आहे. हे खपवून घेणार नाही असा इशाराही देण्यात आला. चर्चेत महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव सहभागी झाले. प्रियांका पाटील, आक्काताई उदगावे, शोभा धुमाळ, सविता परीट, छाया तिप्पट, विद्या पाटील, रेखा कांबळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
चौकट
अंगणवाड्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या
१ त्वरित शासकीय नोकर म्हणून मान्यता द्या
२ निवृत्तीवेतन आणि त्यावेळी एकरकमी लाभ द्यावा
३ मिनी अंगणवाडीमध्येही मदतनीस द्या
४ मोबाईलऐवजी चांगले टॅब द्या. दुरुस्तीसाठीच्या खर्चाची रक्कम द्या
५ अंगणवाडी सक्षमीकरणासाठी जाहीर केलेला निधी द्या
६ कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना विमा रक्कम अदा करा
७ पोषण ट्रॅकर अॅपवर बहिष्कार असल्याने डेटा भरतीसाठी सक्ती करू नका
२४०९२०२१ कोल झेडपी ०१/०२/
कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून रस्त्यावरच ठिय्या मारला. (छाया : आदित्य वेल्हाळ)