मोक्कातील कैद्याचे पोलिसांच्या वाहनातून उडी टाकून पलायन; कोल्हापूर ते चंद्रपूर प्रवासादरम्यान नांदेड जिल्ह्यात थरार
By उद्धव गोडसे | Published: April 8, 2024 07:08 PM2024-04-08T19:08:30+5:302024-04-08T19:09:59+5:30
कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव मोक्क्यातील चार कैद्यांना कळंबा कारागृहातून चंद्रपूर येथील कारागृहात पाठवताना विशाल उर्फ अनिल बाळासाहेब रुपनर (वय ...
कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव मोक्क्यातील चार कैद्यांना कळंबा कारागृहातून चंद्रपूर येथील कारागृहात पाठवताना विशाल उर्फ अनिल बाळासाहेब रुपनर (वय २३, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) या कैद्याने चालत्या वाहनातून उडी टाकून पलायन केले. नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. ८) पहाटे घडलेल्या घटनेनंतर कोल्हापूर आणि नांदेडपोलिसांनी पळालेल्या कैद्याला मडकी कळंबर (जि. नांदेड) येथून चार तासात पुन्हा जेरबंद केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चार कैद्यांना सुरक्षेच्या कारणास्तव चंद्रपूर येथील कारागृहात पाठवले जात होते. रविवारी सकाळी पोलिसांच्या बंदोबस्तात चार कैद्यांसह वाहन चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. पहाटे तीनच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील सोनखेड हद्दीत वाहनाची गती कमी असल्याचे पाहून कैदी विशाल रुपनर याने वाहनाचे दार उघडून बाहेर उडी मारली. काही क्षणात तो रात्रीच्या अंधारात बाजूच्या शेतात गायब झाला.
पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती ११२ क्रमांकावरून नांदेड पोलिसांना दिली. काही वेळातच दाखल झालेले पोलिसांची पथक आणि श्वान पथकाद्वारे कैद्याचा शोध सुरू केला. स्थानिक पोलिस, पोलिस पाटील आणि पोलिस मित्रांच्या मदतीने कैदी रुपनर याला मडकी कळंबर गावाच्या शेतातून ताब्यात घेतले. चार तासांच्या शोध मोहिमेनंतर कैदी सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
नांदेडचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपअधीक्षक सुनीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने आणि त्यांच्या पथकाने कैद्याचा शोध घेतला.
खराब रस्ता आणि काढलेली बेडी
सोनखेड येथे एकेरी आणि खराब रस्ता असल्याने वाहनांची गती कमी असते. कैदी रुपनर याच्या हातात बेडी नव्हती. याचाच फायदा उठवत त्याने पलायन केले. प्रवासादरम्यान कैद्यांना बेडी घालण्यात आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यात कसूर केल्याबद्दल दोषी पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.