कोल्हापूर : गेले पाच दिवस मुसळधार पावसाने जोर धरला असतानाच या पावसात दुचाकी वाहने उभी केल्याने त्यांच्या पेट्रोलच्या टाकीत पाणी जाणे, प्लग व कॉईल शॉर्ट होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे दुचाकीत बिघाड होण्याच्या संख्येत सुमारे २० टक्के वाढ झाली आहे.शहरात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. बहुतांश वेळा नागरिकांची दुचाकी वाहनेही भर पावसातच उभी असतात; त्यामुळे अनेक वाहने रस्त्यावरच बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी चाट बसत आहे.
शहरातील अनेक दुचाकी गॅरेजमध्ये मेस्त्रीकडे वाहनदुरुस्तीसाठी गर्दी होत आहे. रस्त्यावरून दुचाकी धावताना अचानक मुसळधार पाऊस आल्यानंतर प्रवासी आपली दुचाकी रस्त्याकडेला साईटच्या स्टँडवर तिरपी उभी करून पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधतात.अशावेळी गाडी तापलेली असताना तिच्या कॉईल, प्लगवर अथवा वायरिंगवर पाणी पडल्यानंतर ते ‘शॉर्ट’ होते. त्यामुळे अनेक वेळा दुचाकी सुरूच होत नाही. त्यावेळी दुचाकी मेस्त्रीकडे गेल्यानंतर हा प्रकार लक्षात येतो.
याशिवाय टाकीच्या झाकणामधून टाकीतील पेट्रोलमध्ये पाणी जाणे, कार्बोरेटर खराब होणे यासारखे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पावसात दुचाकी उभी करताना त्यावर कव्हर घालणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात अशा पद्धतीने दुचाकी बंद पडण्याच्या प्रमाणात सुमारे २० टक्के वाढ होत आहे.
पावसातच दुचाकी उभी केल्याने पेट्रोलच्या टाकीत पावसाचे पाणी जाणे, प्लग व कॉईल शॉर्ट होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी दुचाकीमध्ये बिघाड होतो. त्यासाठी दुचाकी पावसात झाकून ठेवावी तसेच मध्य स्टँडवर उभी करण्याची दक्षता बाळगावी.- दीपक शिंदे, मेस्त्री, साई अॅटो गॅरेज