आरक्षणासाठी ओबीसीकडून २८ ला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:11+5:302021-06-25T04:19:11+5:30
जयसिंगपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ...
जयसिंगपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. या रद्द केलेल्या आरक्षणाला पूर्ववत करणेसाठीच्या मागणीसाठी सोमवारी (दि.२८) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ओबीसी समाजाच्या बैठकीत ठरले.
तालुक्यातील प्रमुख ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची बैठक रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडली. आरक्षण रद्द केल्यामुळे समाजाच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, अडचणीबाबत चर्चा करून सोमवारी तहसील कार्यालयावर अखिल भारतीय ओबीसी संघटनेच्यावतीने मोर्चा काढून निवेदन देण्याचे ठरले असून जिल्ह्यातील मंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे बैठकीत ठरले.
ओबीसी समाजातील सर्व घटकांना ग्रामपंचायत स्तरापासून पंचायत समिती, जिल्हा परिषदपर्यंत सर्व पदाधिका-यांना एकत्रित करून ओबीसी आरक्षण बचाव चळवळीला मोठे बळ देण्याचे ठरले. बैठकीस पं. स. सभापती दीपाली परीट, पं. स. सदस्य संजय माने, सतीश मलमे, नीलकंठ फल्ले, मनोज रणदिवे, विजय आरगे, बाळासाहेब कोळी, बाचू बंडगर, हिदायत नदाफ, समीर पटेल, कृष्णात लोहार, संजय अनुसे, अशोक पुजारी, पोपट पुजारी, चंद्रकांत गंगधर, सचिन डोंगरे, पोपट साळुंखे उपस्थित होते.