महापालिका निवडणुकीपूर्वी ६० हून अधिक गुंड होणार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:40 AM2021-02-18T04:40:46+5:302021-02-18T04:40:46+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील गुंडांच्या कुंडल्या तयार केल्या आहेत. निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची ...

More than 60 goons will be deported before the municipal elections | महापालिका निवडणुकीपूर्वी ६० हून अधिक गुंड होणार तडीपार

महापालिका निवडणुकीपूर्वी ६० हून अधिक गुंड होणार तडीपार

Next

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील गुंडांच्या कुंडल्या तयार केल्या आहेत. निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असलेल्या सुमारे ६० हून अधिक गुंडांवर लवकरच हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी दिली.

शहरात सध्या किरकोळ वादावादी झाली तरी प्रत्येक गुंड प्राणघातक शस्त्र काढून धाक दाखवतो. या गुंडांच्या वाढत्या कारवाया आगामी महापालिका निवडणुकीत धोकादायक ठरणार आहेत. त्यासाठी त्यांच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या माहितीच्या कुंडल्या एकत्र करण्याचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वीच दिले होते. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुंड, नव्याने निर्माण होत असलेले गुंड यांच्या कुंडल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांनी तयार केल्या. महापालिका निवडणुकीत या गुंडांमार्फत समाजातील शांततेला धोका पोहोचण्याची शक्यता विचारात घेऊन शहरातील सुमारे ६० हून अधिक गुंडांवर तडीपारसारखी कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण आणि करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

वाढत्या घरफोड्या चिंताजनक

शहरासह जिल्ह्यात वाढत्या घरफोड्या, चोऱ्यांच्या प्रमाणावर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी चिंता व्यक्त करीत घरफोड्या, चोऱ्यांच्या तपासावर पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. घरफोड्यांच्या घटनांच्या त्या प्रमाणात उघडकीस येण्याचे व आरोपींना अटक करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्डवरील तसेच नवीन गुन्हेगार यांची माहिती संकलन करावी, अशाही सूचना त्यांनी केल्या. गेल्या तीन महिन्यांत चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरीच्या घटनांतील तपास योग्य दिशेने सुरू असल्याबाबत अधीक्षक बलकवडे यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे.

फुलेवाडी रिंग रोडवर पोलीस चौकी

कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार पाहता घरफोड्या, चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. त्या प्रमाणात पोलिसांचे संख्याबळ अपुरे आहे. उपनगरांसह काही संवेदनशील भागांत उपपोलीस चौक्या उभारण्यात येत आहेत. फुलेवाडी रिंग रोडवरही पोलीस चौकी प्रस्तावित असून त्यालाही पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला.

Web Title: More than 60 goons will be deported before the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.