Kolhapur News: पत्नीसह दोन मुलांना कालव्यात ढकलून स्वत:लाही संपविले, सुदैवाने मुलगी बचावली

By विश्वास पाटील | Published: February 24, 2023 07:15 PM2023-02-24T19:15:07+5:302023-02-24T19:17:19+5:30

परिस्थिती चांगली, मग टोकाचा निर्णय का?

Mother commits suicide with child in canal in Halswade kolhapur | Kolhapur News: पत्नीसह दोन मुलांना कालव्यात ढकलून स्वत:लाही संपविले, सुदैवाने मुलगी बचावली

Kolhapur News: पत्नीसह दोन मुलांना कालव्यात ढकलून स्वत:लाही संपविले, सुदैवाने मुलगी बचावली

googlenewsNext

कागल/गांधीनगर : हालसवडे (ता. करवीर) येथील साउंड सिस्टिम व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह दोन मुलांना कसबा सांगाव (ता. कागल) येथील दूधगंगा डाव्या कालव्यात ढकलून स्वतः भोज (कर्नाटक) येथे झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

यामध्ये पत्नी व नऊवर्षीय मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू झाला, तर तेरा वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली आहे. तिच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप अण्णासाहेब पाटील (३८), राजश्री संदीप पाटील (३२) आणि सन्मित संदीप पाटील (९) अशी मृत्यू झालेल्यांची, तर श्रेया संदीप पाटील (१३) असे जीव वाचलेल्या मुलीचे नाव आहे. रात्री उशिरा कागल पोलिसांत खून व आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने कौटुंबिक कलहातून हे कृत्य केल्याची चर्चा असून, पोलिसांनी अन्य शक्यताही गृहीत धरून तपास सुरू केला आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, संदीप पाटील शुक्रवारी सकाळी पाहुण्यांकडे जाण्यासाठी दुचाकीवरून पत्नी, मुलगा आणि मुलगीसह घराबाहेर पडले होते. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत व कसबा सांगावच्या हद्दीतून जाणाऱ्या कालव्याजवळ आल्यानंतर हा प्रकार घडला. दुपारी २ वाजता मुलगी श्रेया कॅनॉलच्या कठड्यावर जखमी अवस्थेत मदतीची याचना करीत रडत असल्याचे काहींनी पाहिले. कसबा सांगावमधील रियाज कलावंत, मारुती चिखलवाळे, मेहबूब नदाफ, दीपक माने यांनी तिला कॅनॉलमधून बाहेर काढले. 

जखमी अवस्थेतील भांबावलेल्या या मुलीने वेगवेगळी माहिती दिल्याने खून की आत्महत्या, याबद्दल संदिग्धता निर्माण झाली होती. तिने सांगितलेल्या माहितीवरून कागल पोलिसांनी मृतदेहांचा शोध सुरू केला. सन्मित आणि त्याची आई राजश्री यांचे मृतदेह सापडले. संदीप याचाही मृतदेह याच ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. पण रात्री ८ वाजेपर्यंत सापडत नव्हता. घटनास्थळी कोणते वाहनही नव्हते. यामुळे पोलिसांनी इतर ठिकाणीही शोध सुरू केला होता. 

यादरम्यान कर्नाटकातील भोजजवळ संदीप याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी समजली. कालव्याला घासून हा रस्ता गेला आहे. त्यामध्ये नैसर्गिक पाणीसाठाही आहे. रस्त्यापासून वीस फूट खोल आहे. कोणताही संरक्षक कठडा नाही. याचाच फायदा घेत संशयित आरोपीने पत्नी व मुलांना कालव्यात ढकलले असावे, असे पोलिसांनी प्राथमिक अनुमान काढले आहे. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे विभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे करीत आहेत.

परिस्थिती चांगली, मग टोकाचा निर्णय का?

संदीप हा डीजे व्यवसाय करत शेती सांभाळत होता. मनमिळाऊ स्वभाव असल्याने गावामध्ये त्याचा मित्रपरिवार मोठा प्रमाणात होता. त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. मग त्याने पत्नी, मुलगा आणि मुलगीसह आत्महत्या का केली? याचे कोडे त्याच्या मित्रपरिवाराला उलगडेनासे झाले आहे.

वडिलांकडून घेतले दोन लाख

संदीप डीजे व्यवसायात चांगली आर्थिक उलाढाल करत होता. पण गुरुवारी संदीपने वडिलांकडून नवीन व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेतले होते.

भोजमध्ये केली आत्महत्या

दुधगंगा कॅनॉलमध्ये संदीपची पत्नी आणि मुलगा यांचे मृतदेह सापडले. मुलगी जखमी अवस्थेत सापडली. तिला उपचारासाठी सीपीआरला रवाना करण्यात आले. सुदैवाने मुलगी बचावली, पण पत्नी राजश्री आणि मुलगा सन्मित यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. संदीपनेही भोज (ता. चिक्कोडी) येथील अरुण सदाशिव पोवार यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Mother commits suicide with child in canal in Halswade kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.