कोल्हापूर : शुक्रवारपासून सुरु होणाºया गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात पोलिसांनी गुरुवारी दंगल नियंत्रण काबूची प्रात्यक्षिके करुन संचलन केले. याचबरोबर नाकाबंदी, पोलीस अभिलेखावरील (रेकॉर्ड) आठ गुन्हेगारांची माहिती घेऊन पोलिस ठाण्यातझाडाझडती घेतली.
शुक्रवारपासून गणेशोत्सव व पुढील आठवड्यात बकरी ईद आहे. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकात शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दंगल नियंत्रण काबू प्रात्यक्षिक करण्यासाठी एकत्र जमले.यामध्ये चार पोलिस निरीक्षक, १२ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह १५० कर्मचारी यांच्यासह जलद कृती दल यांचा समावेश होता. या ठिकाणी प्रात्यक्षिके करुन मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, भवानी मंडप, लक्ष्मीपुरी मार्गे रविवार पेठ, सोमवार पेठेतून संचलन करत पोलीस दसरा चौकात आले. याठिकाणीही दंगल नियंत्रण काबूची प्रात्यक्षिके करुन सांगता झाली.या प्रात्यक्षिकांसह तावडे हॉटेल, ताराबाई पार्क येथील पितळी गणपती, सायबर चौक, शिवाजी चौक आदी ठिकाणी नाकाबंदी करुन सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच पोलीस रेकॉर्डवरील आठ गुन्हेगारांची माहिती चारही पोलीस ठाण्यात घेतली. यावेळी करवीर तहसिलदार यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.