कोल्हापूर : आकाशगंगेचे वस्तुमान व वेगाबाबत वेगवेगळे सिद्धान्त मांडले गेले. याच विषयावर गोंदिया येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी संशोधनाद्वारे नवीन सिद्धान्त मांडलेला आहे. त्यांच्या सिद्धान्तामुळे आकाशगंगेमधील ताऱ्यांचा अधिक वेग सिद्ध करता येणार आहे. या सिद्धान्तानुसार दीर्घिकेमधील ताऱ्यांचा वेग आणि प्रत्यक्ष निरीक्षणानुसार आढळून येणाऱ्या ताऱ्यांचा वेग समान आहे. या संशोधनामुळे आकाशगंगेतील ताऱ्यांच्या वेगाचे कोडे सोडविण्यात यश आल्याचा दावा, प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी केला.
मुंडासे म्हणाले, तारामंडळ (आकाशगंगा) मधील दूर आणि अतिदूर अंतरावर असलेले तारे जास्त वेगाने फिरत असल्याचे अनेक अवकाश संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या निरीक्षणास आले. यामध्ये निरीक्षणांती तारामंडळामधील सर्व तारे जास्त वेगाने फिरत असल्याचे सिद्ध झालेले आहे.
गेली अनेक वर्षे याबाबत संशोधन झाले; परंतु कोणताही सिद्धान्त या प्रश्नांचा पूर्ण उलगडा करू शकलेला नाही. याबाबत गेली दोन वर्षे मी संशोधन केले असता, यातून भौतिकशास्त्रामधील अत्यंत जटील प्रश्नांचा उलगडा करण्यात मला यश आले आहे. संशोधनाअंती तयार केलेल्या सिद्धान्तानुसार ‘डार्क मॅटर’ (कृष्णद्रव्य) या घटकाची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.
आकाशगंगेमधील केंद्राची जवळीक तसेच अतिदूर ताऱ्यांचा वेग यांची अचूक गणना करता येणार आहे. तसेच संपूर्ण आकाशगंगेचे वस्तुमान व रचना यांचीदेखील अचूक गणना करता येणार आहे.
दोन वर्षे संशोधनप्राचार्य रवींद्र मुंडासे हे मुळचे सोलापूरचे असून त्यांनी बी. ई. (मेकॅनिकल) व एम.बी.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. एका खासगी कंपनीत पाच वर्षे उच्च पदावर कार्यरत होते. त्यानंतर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते शासकीय नोकरीत रुजू झाले. कोल्हापूर येथील शासकीय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे त्यांनी उपप्राचार्य पदावर काम केले आहे. गेली दोन वर्षे ते आकाशगंगेतील संशोधन करीत आहेत. या संशोधनातून त्यांनी हा सिद्धान्त तयार केला आहे.फोटो आहे