लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुठेही तोकडी पडणार नाही. येत्या काही दिवसांत महापालिका यंत्रणेतून ४४० ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध केले जातील. याबरोबर आयसोलेशन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन जनरेटर प्लांट २० दिवसांत बसविण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली. तत्पूर्वी पालकमंत्री पाटील यांनी ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेतला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये पन्नास टक्के रुग्ण हे शहरातील आहेत. त्यामुळे शहरातील यंत्रणा वेळेवर कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी एकावेळी २२०० रुग्ण पॉझिटिव्ह येत होते, अशी परिस्थिती होती. त्यामुळे आता एकावेळी दिवसात ३३०० रुग्ण पॉझिटिव्ह आले तरी यंत्रणा कुठेही तोकडी पडणार नाही, याचे नियोजन करण्यात आले आहे. आयसोलेशन रुग्णालयाजवळ ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्याची कार्यवाही सुरू असून येत्या २० दिवसांत बसविण्यात येणार आहे. तर ४४० ऑक्सिजनेटेड बेड हे महापालिकेच्या यंत्रणेत उपलब्ध केले जाणार आहेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालयात ६२५ बेड उपलब्ध आहेत. सध्या पन्नास टक्के व्हेंटिलेटर हे उपलब्ध आहेत तर उर्वरित व्हेंटिलेटरही उपलब्ध केले जातील. मात्र, नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे. कारण परिस्थिती हाताबाहेर जाण्याला वेळ लागणार नाही. तर शहराची कोरोना परिस्थितीची जाणीव लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे. अन्यथा घरातून बाहेर पडू नका. शनिवारपासून शहरात बॅरिकेटींग करून कंटेन्मेंट झोन करीत आहोत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आयुक्त कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी अधिकारी उपस्थित होते.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर
कोल्हापूर शहरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिल्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. बाहेर जिल्ह्यातून आलेले लोक पॉझिटिव्ह येत आहेत. त्यांची व्यवस्था केली जात आहे. प्रशासन यामध्ये कुठेही कमी पडत नाही. सर्वांना सेवा देण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.