कोल्हापूर : महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी प्रभाग आरक्षण जाहीर झाले. सोडतीद्वारे आरक्षण जाहीर करण्यात येईल, असे आधी जाहीर करण्यात आले होते; मात्र तब्बल ६० प्रभागांवर सोडत न काढताच थेट आरक्षण टाकण्यात आले. केवळ २१ प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले.
आरक्षण जाहीर होत असताना उपस्थितांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला; पण ‘तुमच्या सूचना व हरकती द्या, त्यावर सुनावणी घेऊ’, इतकेच माफक उत्तर देऊन अधिकाऱ्यांनी अधिक खोलात जाण्याचे टाळले.
आरक्षण सोडत जाहीर करण्याची ही प्रक्रिया येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सुमारे पावणेतीन तास चालली. सभागृहात आसनक्षमतेच्या पन्नास टक्के प्रेक्षकांनाच बसण्यास परवानगी दिली होती. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस, अव्वल सचिव अतुल जाधव व कक्ष अधिकारी प्रदीप परब यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, चेतन कोंडे, संदीप घार्गे, निवडणूक अधीक्षक विजय वणकुद्रे यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी शहरातील १ ते ८१ प्रभागांचे सादरीकरण केले. सर्वप्रथम अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अकरा प्रभागांवर आरक्षण निश्चित करण्यात आले. हे आरक्षण निश्चित करताना त्या त्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी विचारात घेण्यात आली. त्याआधारे अकरा प्रभागांची नावे जाहीर करण्यात आली. त्यातून मग सहा प्रभाग याच प्रवर्गातील महिलांसाठी निश्चित करण्यात आले. त्यामध्ये पूर्वी महिलांसाठी आरक्षण नसलेल्या तीन प्रभागांवर थेट आरक्षण टाकण्यात आले, तर तीन प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले.
१५ प्रभागांवर ओबीसीचे थेट आरक्षण
नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गासाठी २२ प्रभाग निश्चित करण्यात आले. मागच्या तीन निवडणुकीत ज्या प्रभागांवर ओबीसी आरक्षण नव्हते, अशा १५ प्रभागांवर थेट आरक्षण जाहीर करण्यात आले, तर सात प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या २२ प्रभागांतील अकरा प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक १३ व २४ वर थेट आरक्षण टाकण्यात आले, तर नऊ प्रभाग सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले.
फक्त दोनच प्रभागांत सर्वसाधारण महिलांसाठी सोडत -
सर्वसाधारण प्रवर्गासाठी सगळ्यात जास्त उत्कंठा लागून राहिलेली होती. अनुसूचित जातीचे अकरा व ओबीसीचे २२ प्रवर्ग निश्चित झाल्यानंतर ४८ प्रभाग आपोआपच सर्वसाधारण झाले. परंतु, त्यातून २४ प्रभागांवर महिलांचे आरक्षण निश्चित केले गेले. २००५, २०१० व २०१५ च्या निवडणुकीत महिला आरक्षण नसलेले २४ प्रभाग त्यासाठी पात्र ठरविण्यात आले. २२ प्रभागांवर यापूर्वी महिला आरक्षण नव्हते, त्या प्रभागांवर थेट सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित केले, तर केवळ दोन प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे जाहीर केले.
अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ण होईपर्यंत कसलीच उत्सुकता नव्हती; परंतु ओबीसी व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित केले जात होते, तेव्हा क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढत गेली. परंतु, ही उत्कंठा पुढे काही वेळातच संपुष्टात आली. सभागृहात उपस्थित असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यांवर उत्साह फुललेला दिसून आला; पण ज्यांचे प्रभाग गेले, त्यांच्या चेहऱ्यावर मात्र तीव्र नाराजी दिसून आली.
शेवटी आभार विनायक औंधकर यांनी मानले.
महापौर पदाची संधी असणारे प्रभाग...
पहिल्या अडीच वर्षासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी महापौरपद आरक्षित असल्याने या प्रभागात मोठी चुरस असणार आहे. प्रभाग क्रमांक १३ : रमणमळा, प्रभाग १५ कनाननगर, प्रभाग २१ टेंबलाईवाडी, प्रभाग २४ साईक्स एक्स्टेन्शन, प्रभाग ३६ राजारामपुरी, प्रभाग ४९ रंकाळा स्टँड, प्रभाग ५२ बलराम कॉलनी, प्रभाग ५३ दुधाळी पॅव्हेलियन, प्रभाग ५६ संभाजीनगर बसस्थानक, प्रभाग ६४ शिवाजी विद्यापीठ, प्रभाग ७१ रंकाळा तलाव हे प्रभाग महापौर ठरविणारे आहेत.