मुलाच्या लग्नासाठी शेती दाखवायला गेलेल्या महिलेचा दागिन्यांसाठी खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:26 AM2021-03-16T04:26:40+5:302021-03-16T04:26:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळेकरंजफेण : मुलाचे लग्न ठरविण्यासाठी शेती दाखविण्याच्या बहाण्याने महिलेला शेतात नेऊन दागिन्यांसाठी तिचा खून केल्याची घटना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कळेकरंजफेण : मुलाचे लग्न ठरविण्यासाठी शेती दाखविण्याच्या बहाण्याने महिलेला शेतात नेऊन दागिन्यांसाठी तिचा खून केल्याची घटना सोमवारी गगनबावडाजवळील मार्गेवाडी येथे उघडकीस आली. छबूबाई केरबा पाटील (वय ५८, रा. कसबा बोरगाव, ता. पन्हाळा) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी असंडोली येथील प्रकाश सदाशिव कुंभार (वय ३५) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. छबूबाई पाटील या गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होत्या.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कसबा बोरगाव येथील छबूबाई पाटील यांना दोन मुले असून, ते खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या लग्नासाठी मुलींचा शोध सुरू आहे. ६ मार्च रोजी एका व्यक्तीने मुलांसाठी चांगले स्थळ असल्याचे सांगून घर व शेती पाहणार असल्याचे त्यांना सांगितले. संबंधित व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडत छबूबाई यांनी घर दाखविले, तसेच नदीकाठी असलेली शेती दाखविण्यासाठी त्या व्यक्तीच्या मोटारसायकलवरून शेतात गेल्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. बेपत्ता असल्याची नोंद पन्हाळा पोलिसांत केली होती. त्यांच्या अंगावर सहा तोळे सोन्याचे दागिने असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा घातपात झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत होता.
या प्रकरणातील संशयित प्रकाश कुंभार हा कळे येथील एका सराफाकडे दागिने विक्री करण्यास आला होता. सराफाच्या चाणाक्षपणाने हे दागिने चोरीचे असल्याचे जाणवले. त्यातून खुनाचे रहस्य उलगडले. छबूबाई यांना घोटवडे येथील डोंगरावर ठार मारून त्यांचे दागिने काढून घेऊन मृतदेह पोत्यात घालून मोटारसायकलने गगनबावड्याजवळील मार्गेवाडी येथील नदीजवळ टाकल्याचे पोलीस तपासात उघड झाले. प्रकाश कुंभार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, कर्जबाजारी असल्याचे समजते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पोलीस निरीक्षक ए.डी. फडतरे, सहाय्यक फौजदार नरेंद्र पाटील अधिक तपास करीत आहेत.
........
मुलांच्या लग्नाचे स्वप्न अधुरे
मनमिळाऊ स्वभावाच्या छबूबाई बेपत्ता झाल्यापासून गावातील लोकांनी शोध घेण्याचे बरेच प्रयत्न केले. त्यांचे पती दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. गरिबीतून दिवस काढल्याने मुले आता कमवती झाल्याने पतीच्या डोळ्यादेखत लग्न व्हावे ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या मृत्यूमुळे ती इच्छा अपूर्णच राहिली. मुलांनी आईचा मृतदेह पाहून फोडलेला हंबरडा पाहून गावकरीदेखील गहिवरले.
फोटो- १५मृत छबूबाई पाटील
१५आरोपी प्रकाश कुंभार