मद्यधुंद डॉक्टरकडून विनयभंगाचा प्रयत्न
By admin | Published: February 25, 2016 01:24 AM2016-02-25T01:24:16+5:302016-02-25T01:39:28+5:30
संशयितास बेदम चोप : महिला डॉक्टरची तक्रार; पोलिसांत गुन्हा; ‘सीपीआर’मधील घटना
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) नवजात शिशू विभागातील विश्रांती कक्षामध्ये बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद व अर्धनग्न (अंडरपॅन्ट घातलेल्या) अवस्थेत असलेल्या डॉक्टरने झोपलेल्या विवाहित महिला डॉक्टरचा (रा. मूळ नागपूर) विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने भेदरलेल्या महिला डॉक्टरने आरडाओरड केल्याने गोंधळ उडाला.
ड्यूटीवर असलेल्या परिचारिका व सुरक्षारक्षकांनी धाव घेत या मद्यधुंद डॉक्टरला तेथून हाकलून लावले. संबंधित महिलेच्या पतीने या डॉक्टरास रुग्णालयाच्या आवारातच बेदम चोप दिला. या प्रकरणी महिला डॉक्टरने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी संशयित डॉक्टर पंकज हरिश्चंद्र पाटील (वय २४, रा. कळंबोली, ठाणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर डॉ. पाटील हा पसार झाला असून, त्याने मोबाईलही बंद ठेवला (पान १० वर)