कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू शेतकरी या नावाने तगडे पॅनेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सत्ताधारी गटाला हादरा देण्यासाठी विरोधकांची मोट मुश्रीफ यांनी बांधली आहे. सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीसाठी तीन मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार आणि काही संचालक उपस्थित होते. कोणत्या गटाला किती जागा द्यायच्या याबाबत अंतिम निर्णय येत्या आठवड्यात घेतला जाणार आहे.
या बैठकीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, यांच्यासोबतमाजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यानंतर आता आमदार विनय कोरेही विरोधी छावणीत दाखल झाले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.
मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, के. पी. पाटील, खासदार संजय मंडलिक, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुणकुमार डोंगळे , जयश्री पाटील- चुयेकर यांच्यासह सहा संचालक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव , गोपाळराव पाटील आदी या बैठकीला उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू
एकीकडे विरोधकांच्या बैठकांवर बैठका सुरू असताना सत्तारूढ गटाचे संचालक मात्र ठरावधारकांच्या गाठीभेटीत व्यस्त आहेत. थेट मतदारांना भेटून पाच वर्षांत केलेल्या कामाची माहिती ते देत आहेत.