कोल्हापूर, दि. 26 : : मुस्लिम बोर्डींग निवडणुकीच्या वादातून अज्ञात ५0 जणांनी बुधवारी दुपारी रविवार पेठेतील महात गल्लीत सशस्त्र हल्ला केला. हल्लेखोरांनी पेट्रोल टाकून मोटारसायकल जाळण्याचा प्रयत्न केला, तर एका घरावर दगडफेक केली. या गल्लीतील चार वाहनांचीही तोडफोड हल्लेखोरांनी केली.
बुधवारी दुपारी अचानक हा प्रकार घडला. यामुळे लक्ष्मीपुरी पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे रविवार पेठ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
रविवार पेठेतील बागवान गल्लीशेजारील महात गल्लीत राहणाºया गणी आजरेकर पॅनेलचे समर्थक शौकत इकबाल बागवान यांनी या निवडणुकीत काम केले होते. निवडणुकीच्या वादातून बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ५0 जण तोंडाला स्कार्फ बांधून महात गल्लीत शिरले. त्यांच्या हातात दगड, काठ्या, पेट्रोलच्या बाटल्या, शस्त्रे होती. त्यांनी शौकत बागवान यांच्या घरावर दगडफेक करुन घरापुढे लावलेल्या काचा फोडल्या, तसेच दारात उभी असलेली बुलेट मोटारसायकल पेटवली. त्यानंतर गल्लीतील इतर चार मोटारसायकलीचीही तोडफोड केली. त्यानंतर हल्लेखोरांनी बागवान यांच्या घरात शिरुन तेथील साहित्य विस्कटले.
घरातील महिलांना चाकूचा धाक दाखवत तिजोरीतील साहित्यही विस्कटले. गल्लीत असलेल्या तडाका या मंडळाचे कार्यालयही पेटवण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. तेथे उभी असणारी टेंपो रिक्षाही फोडली.
हा प्रकार समजल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु हल्लेखोर पळून गेले होते. या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव दलाची तुकडी या पररिसरात तैनात करण्यात आली आहे. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची नामवंत संस्था म्हणून ओळखणाºया येथील मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग)च्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीतील पॅनेलमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या.
प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया या निवडणुकीकडे संपूर्ण मुस्लिम समाजाचे लक्ष लागून होते. १५ जागांसाठी ३८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. संस्थेची त्रैवार्षिक निवडणुकीची मुदत सन २०१० ला संपली होती; पण त्यानंतर ही निवडणूक विविध कारणांस्तव न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली होती. एकूण २३०० मतदार असून त्यांतील मृत व हरकती आलेल्या मतदारांची नावे कमी होऊन किमान १५५० मतदान निवडणुकीसाठी पात्र ठरली होती.
आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजलेल्या व चुरशीच्या झालेल्या लढतीत गणी आजरेकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी ‘फताह उल आभिमन’ जुने पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागांवर निर्विवाद बहुमत मिळवीत एकहाती सत्ता मिळविली. विरोधी यासीन बागवान आणि हिदायत मणेर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू मुस्लिम बोर्डिंग परिवर्तन पॅनेलच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला होता.