...माझा कोल्हापूरचा अध्याय सुरू झाला- हिंदकेसरी दीनानाथसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:11 PM2018-03-10T23:11:59+5:302018-03-10T23:11:59+5:30

कोल्हापूरच्या रांगड्या भाषेमुळे झालेल्या गैरसमजामुळे मी कोल्हापूर सोडण्याचा विचार केला होता. मात्र त्यांनी माझ्या मनातील गैरसमज दूर करत महाराष्टÑ केसरी स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.....

... my chapter of Kolhapur started - Hindakesari Dinanath Singh | ...माझा कोल्हापूरचा अध्याय सुरू झाला- हिंदकेसरी दीनानाथसिंह

...माझा कोल्हापूरचा अध्याय सुरू झाला- हिंदकेसरी दीनानाथसिंह

Next
ठळक मुद्देहिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी --लाल माती

कोल्हापूरच्या रांगड्या भाषेमुळे झालेल्या गैरसमजामुळे मी कोल्हापूर सोडण्याचा विचार केला होता. मात्र त्यांनी माझ्या मनातील गैरसमज दूर करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.....

कोल्हापुरातील गंगावेस तालमीत माझे बाबूराव गवळी, गणपत ससे, निंबाळकर वस्ताद, कादर वस्ताद, शामराव आणि गोविंदा मेस्त्री हे वस्ताद होते. पैलवान अण्णाप्पा पाडळकर हे गंगावेस तालमीचे अध्यक्ष होते. विष्णू नागराळेंबरोबर लढलेले मोरे पैलवान हेदेखील वस्ताद होते. या वस्तादांच्या देखरेखेखाली माझी तयारी सुरू झाली. एक वस्ताद गेला की दुसरा यायचा. करडी शिस्त होती. रोज १२०० ते १५०० पर्यंत जोर मारावे लागत. आखाडा तोडणे, कमरेवर पैलवान बसवून आखाड्यात गोल फिरणे, डंबल्स मारणे असा व्यायाम घेतला जाई.
कोल्हापुरात आल्यावर आयुष्यात पहिल्यांदा मी ‘रांडंच्या’ ही शिवी ऐकली. तालमीतून बाहेर पडल्यावर वर मान करायची नाही, असा वचक असायचा. वर मान केलेली वस्तादांना आवडायची नाही. त्यामागे पैलवानांनी चारित्र्य जपले पाहिजे, असा अट्टहास असे. त्यावेळी आम्हांला लागलेली ही सवय आयुष्यभर कायम राहिली. वस्ताद शिव्या द्यायचे, मारायचेही; परंतु कुठे लागले तर मात्र औषध द्यायलाही मायेने पुढे यायचे. एरव्ही माया करणार; परंतु मेहनत करताना मात्र कठोर वागणार असे ते वस्ताद होते. असे सगळे सुरू होते; तथापि माझे मन मात्र काही दिवसांत अस्वस्थ होते. कोल्हापूर सोडून घरी जावे असा विचार मनात बळ धरू लागला होता. त्यामुळे मी तालमीत मागे बसून काही वेळा रडत असे. दूधकट्ट्यावर दूध प्यायला गेल्यावर तिथेही अधूनमधून मी मुंबईला परत जाणार, असे रागातून म्हणत असे.
त्यावेळी पैलवान मारुती माने हे बुलेटवरून अर्बन बँकेसमोरील गंगावेशच्या दूधकट्ट्यावर रोज दूध प्यायला यायचे. त्यावेळी तेथील एका म्हशीवाल्याने त्यांना सांगितलं,‘ ते मुंबईचें भैय्याचं पोरगं अंगापिंडानं चांगलं हाय. त्याच्या अंगात चांगली कुस्ती हाय; परंतु ते परत मुंबईला जायचं म्हणतंय...!’ ते ऐकून मारुती माने तशीच बुलेट घेऊन थेट तालमीत आले. त्यांनी मला बोलावून घेतले आणि सर्वांसमक्षच ‘का रे, परत मुंबईला जायचं म्हणतोस?’ अशी करारी शब्दांत विचारणा केली. मी त्यांना म्हणालो, ‘मी कुस्तीसाठी कितीही अंगमेहनत करतो. त्यासाठी वस्ताद मला कितीही मारूद्यात, मला त्याचे काही वाटत नाही; परंतु इथले सगळेच वस्ताद आईबहिणीवरून घाण-घाण शिव्या देतात, ते मला सहन होत नाही.’
मारुती माने तालमीत आल्याचे पाहून पाच मिनिटांत सारे वस्ताद तिथे धावून आले. बाबूराव गवळी, ससे पैलवान, अण्णाप्पा पाडळकर हे समोरच होते. त्यांना मारुती माने यांनी ‘या पैलवानाला शिव्या का देता?’ असे दरडावून विचारले. तेव्हा गवळी वस्ताद मोठ्या आवाजात म्हणाले, ‘अरं रांडंच्या, तुला रं कवा आम्ही शिव्या दिल्या?’ हे ऐकून मारुती माने मोठमोठ्याने हसू लागले. मी गप्पच उभा राहिलो. सर्वच वस्तादांच्या ध्यानात ही गोष्ट आली. त्यांनी मला समजुतीच्या भाषेत सांगितले, ‘आरं, ही कोल्हापूरची रांगडी भाषा आहे. रांडंच्या ही शिवी नाही. कोल्हापुरी माणूस प्रेमाने तसे बोलावतो. त्याची तुलाही सवय होईल. त्यामुळे तू एवढ्यासाठी तालीम सोडून जाऊ नकोस.’ मारुती माने बुलेटवरून जोतिबाला निघाले होते. ते म्हणाले, ‘दीनानाथ, मी जोतिबाला निघालो आहे. तू मला वचन दे की मी कोल्हापूर सोडून जाणार नाही म्हणून... आणि ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेवर लक्ष केंद्रित कर.’ मी त्यांना तसा शब्द दिला व माझ्या आयुष्यातील कोल्हापूरचा अध्याय सुरू झाला.
- शब्दांकन : विश्वास पाटील

Web Title: ... my chapter of Kolhapur started - Hindakesari Dinanath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.