कोल्हापूर : माझ्या खासदारकीत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळापासून अधिकारी, कर्मचारी व अगदी शिपायांपर्यंत सर्वांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केले. बँकेचे संचालक या नात्याने प्रा. मंडलिक यांचा संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार झाला.खासदार मंडलिक म्हणाले, ‘ही बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची मुख्य वाहिनी आहे. माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक व माजी खासदार निवेदिता माने हे खासदार होऊन या बँकेचे संचालक झाले. मला मात्र या बँकेने संचालक झाल्यानंतर खासदार केले. बँकेने शेतकऱ्यांसाठी अपात्र कर्जमाफीची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे. लवकरच न्यायालयीन निकाल लागेल; परंतु केंद्र सरकारच्या पातळीवर आवश्यक ते प्रयत्नही करू.यावेळी संचालक सर्वश्री आर. के. पोवार, पी. जी. शिंदे, विलासराव गाताडे, राजेश पाटील, अनिल पाटील, भैय्या माने, राजू आवळे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर तसेच असिफ फरास, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मुश्रीफ मोदी यांच्यापुढेप्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘प्रशासकांची कारकीर्द संपून चार वर्षांपूर्वी आमचे संचालक मंडळ या बँकेत सत्ताधारी झाले. त्यावेळी सर्वच पातळ्यांवर बँक अत्यंत अडचणीत आली होती. आमदार हसन मुश्रीफ यांनी गटातटापलीकडे जाऊन काम करण्याचे आवाहन संचालक मंडळाला केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षे सर्वच संचालक मंडळ निपक्षपातीपणे या बँकेच्या विकासासाठी झटत आहे; त्यामुळेच बँक आज प्रगतीपथावर आल्याचे दिसते. ‘सबका साथ सबका विकास’ या भावनेने काम करण्यात आमदार मुश्रीफ हे पंतप्रधान मोदींच्याही काकणभर पुढेच आहेत.