एन. डी. पाटील यांना ‘सांगली भूषण’

By admin | Published: January 9, 2017 11:06 PM2017-01-09T23:06:32+5:302017-01-09T23:06:32+5:30

एन. डी. पाटील यांना ‘सांगली भूषण’

N. D. Patil's 'Sangli Bhushan' | एन. डी. पाटील यांना ‘सांगली भूषण’

एन. डी. पाटील यांना ‘सांगली भूषण’

Next


सांगली : यंदाचा ‘सांगली भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार असल्याची माहिती येथील विश्वजागृती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी सोमवारी दिली. पंचवीस हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विश्वजागृती मंडळातर्फे गेल्या १९ वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तीस ‘सांगली भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार आहे. पुरस्कार प्रदान समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. पाटील यांचा जन्म ५ जुलै १९२९ रोजी ढवळी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एलएल. बी. (पुणे विद्यापीठ) असे शिक्षण पूर्ण केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे त्यांच्यावर संस्कार झाले. या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन प्रा. डॉ. पाटील यांनी १९५४ ते १९५७ या काळात सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अध्यापन केले. १९६० मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या एकतिसाव्यावर्षी इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य, सिनेट सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नंतर कार्यवाह, राज्य प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. दरम्यान, १९४८ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले. १९८५ ते १९९० ते विधानसभेचे सदस्य, तर अठरा वर्षे ते विधानपरिषदेचे सदस्य होते. १९७८-८० या काळात राज्याचे सहकारमंत्री म्हणून त्यांनी कामाचा स्वतंत्र ठसा उमटविला. एकाधिकार कापूस खरेदी योजना सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनीच घेतला. स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ (नांदेड), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ यांनी सन्माननीय डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. प्रख्यात आणि प्रभावी वक्ते म्हणून प्रा. डॉ. पाटील यांची ओळख आहे. शेतकरी, कामगार, शोषित यांच्या अनेक लढ्यांचे नेतृत्व त्यांनी केले. आज वयाच्या ८८ व्या वर्षीही ते शेतकरी आणि सामान्यांच्या आंदोलनात अग्रभागी असतात. (प्रतिनिधी)

Web Title: N. D. Patil's 'Sangli Bhushan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.