पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी ‘नमामि गंगा’ प्रकल्प राबवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:26 AM2021-03-17T04:26:29+5:302021-03-17T04:26:29+5:30
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी ‘नमामि गंगा’ प्रकल्प राबवावा अशा मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांचा २०१७ पासून केंद्रीय पर्यावरण मंत्रालय ...
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी ‘नमामि गंगा’ प्रकल्प राबवावा अशा मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांचा २०१७ पासून केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयासोबत पत्रव्यवहारांनी पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे पंतप्रधान कार्यालयास पंचगंगा नदी व नदीप्रदूषण याविषयी संपूर्ण डेटा प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर खा. संभाजीराजे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मंगळवारी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
पंचगंगा नदी प्रदूषणामध्ये विविध कारणांमुळे लक्षणीय वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ही एक प्रमुख नदी असून हजारो एकर क्षेत्र या नदीमुळे ओलिताखाली आले आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी ‘नमामि गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर पंचगंगा प्रदूषण मुक्ती प्रकल्प राबवावा अशी मागणी २०१७ मध्ये प्रथम राज्यसभेत केली होती.
पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत, मंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा सविस्तर आराखडा सादर करण्याची जबाबदारी उचलली.
फोटो नं. १६०३२०२१-कोल- संभाजीराजे
ओळ: पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी ‘नमामि गंगा’ प्रकल्प राबवावा या मागणीसाठी बैठकीत खासदार संभाजीराजे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने हेही उपस्थित होते.