लोककला केंद्रास जिजाऊंचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:08 AM2018-01-13T01:08:05+5:302018-01-13T01:08:51+5:30
कोल्हापूर : दीक्षांत समारंभासह विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रम होणाºया शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील विविध घटना आणि प्रसंगांची माहिती देणाºया संग्रहालयाची उभारणी विद्यापीठात करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शुक्रवारी येथे करण्यात आली. संघाच्या शिष्टमंडळातर्फे या मागणीचे निवेदन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना देण्यात आले.
शिष्टमंडळाच्यावतीने संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मागणीच्या अनुषंगाने माहिती दिली. विद्यापीठातील लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, या मागणीचे निवेदन यापूर्वीही दोन वेळा विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे; परंतु अद्यापही विद्यापीठस्तरावर नाव देण्याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा जिजाऊ जयंतीदिनी निवेदन देत आहोत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने विद्यापीठ विभूषित झाले आहे. जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची योग्य प्रकारे जडणघडण करीत स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. त्या जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मृती शिवाजी विद्यापीठात जतन झाल्या पाहिजेत. त्यामुळे या लोककला केंद्रास त्यांचे नाव देण्यात यावे. त्यासह शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे पुतळे विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात यावेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि प्रसंगांची माहिती देणाºया संग्रहालयाची उभारणी करावी यासाठी येत्या अधिसभेमध्ये ठराव मंजूर करावेत, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळाने निवेदन दिले त्यावेळी विद्यापीठाचे उपकुलसचिव व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. संघाच्या शिष्टमंडळात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, बबनराव रानगे, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, शिरीष जाधव, शरद साळुंखे, सुजित खामकर, अवधूत पाटील, बयाजी शेळके, बाबूराव बोडके, अजिंक्य पाटील, प्रसाद पाटील, डी. आर. बुडके, आदींचा समावेश होता.
लवकरच संग्रहालय
शिष्टमंडळाने केलेल्या मागणीबाबत कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, नाव बदलण्याचा पूर्ण अधिकार मंडळास आहे. अधिकार मंडळाच्या निवडणुका होऊन सदस्य निवडले गेले असले तरी अजून पूर्ण अधिकार मंडळ निवडलेले नाही. मार्चमध्ये पूर्ण अधिकार मंडळ अस्तित्वात येईल. त्यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. लवकरच हे संग्रहालय अस्तित्वात येणार आहे.