बंडाळी रोखण्यासाठी शेवटपर्यंत नावे गुलदस्त्यात राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 01:24 PM2021-03-22T13:24:08+5:302021-03-22T13:37:47+5:30
Gokul Milk Elecation Kolhapur-गोकुळसाठी विरोधी आघाडीकडे इच्छुकांची मांदियाळी असल्याने नेत्यांची डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाळी होणार, ते टाळण्यासाठी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेल गुलदस्त्यात ठेवण्याची व्यूहरचना विरोधी आघाडीच्या नेत्यांची आहे. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्री पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके व विश्वास पाटील यांचीही रविवारी बैठक झाली.
कोल्हापूर :गोकुळसाठी विरोधी आघाडीकडे इच्छुकांची मांदियाळी असल्याने नेत्यांची डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाळी होणार, ते टाळण्यासाठी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेल गुलदस्त्यात ठेवण्याची व्यूहरचना विरोधी आघाडीच्या नेत्यांची आहे. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्री पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके व विश्वास पाटील यांचीही रविवारी बैठक झाली.
खासदार संजय मंडलिक हे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने ह्यगोकुळह्णच्या चर्चेत सहभागी नव्हते. ते शनिवारी रात्री कोल्हापुरात आल्यानंतर घडामोडींनी वेग घेतला. रविवारी दुपारी मंत्री पाटील, खासदार मंडलिक व आमदार आबिटकर यांची बैठक झाली. यामध्ये एकूण पॅनेलची रचना, कोणाला किती जागा द्याव्या लागतील, यासह इतर महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली.
विरोधी आघाडीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजांची संख्याही वाढणार आहे. ती थोपविताना नेत्यांची दमछाक होणार आहे. ते टाळून विरोधाची धार कमी करायची झाल्यास पॅनेल शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवावे, असा मतप्रवाह पुढे आला आहे. माघारीच्या शेवटच्या क्षणी पॅनेल जाहीर केल्याने इच्छुक इतरांच्या हाताला लागणार नाहीत, त्यामुळे बंडाळी शमविण्यात यश येईल, अशी अटकळ विरोधी आघाडीच्या नेत्यांची आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी मंत्री सतेज पाटील, चंद्रदीप नरके व विश्वास पाटील यांची करवीर तालुक्यातील जागा वाटपाबाबत बैठक झाली. येथे विश्वास पाटील व नरके यांनी दोन जागांवर आग्रह धरल्याचे समजते. करवीरला पाच जागा मिळणार असून, त्यामध्ये विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगुले यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. चौथी जागा शेकापला मिळू शकते. पाचवी जागा मंत्री पाटील ह्यदक्षिणह्णमध्ये टाकू शकतात.