कोल्हापुरात नऊ महिन्यांत उभारणार नेत्ररुग्णालय -- : पालकमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:48 AM2019-06-11T00:48:26+5:302019-06-11T00:48:57+5:30
शहरातील नागाळा पार्क परिसरात भाजपच्या कार्यालयासाठी २३ हजार स्क्वेअर फुटांची जागा घेण्यात आली आहे. त्यामध्ये नेत्ररुग्णालय व नेत्रपेढी करण्यात येणार असून, तिचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केली.
कोल्हापूर : शहरातील नागाळा पार्क परिसरात भाजपच्या कार्यालयासाठी २३ हजार स्क्वेअर फुटांची जागा घेण्यात आली आहे. त्यामध्ये नेत्ररुग्णालय व नेत्रपेढी करण्यात येणार असून, तिचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केली. त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांची माहिती लहानपणापासूनच मिळण्यासाठी ‘ट्रॅफिक गार्डन’ उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोलीस उद्यान येथे ‘केएसबीपी’व पोलीस प्रशासनातर्फे उभारलेल्या ‘ट्रॅफिक गार्डन’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. ृयावेळी अंजली चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार प्रा. संजय मंडलिक, भाजपचे राज्य प्रवक्ते माधव भंडारी, ‘देवस्थान’चे अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, संदीप देसाई, राहुल चिकोडे, सुजय पित्रे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
असे असेल ‘ट्रॅफिक गार्डन’
मुख्यालयात उद्यानाशेजारी तीन एकर जागेत गार्डन तयार झाले आहे. सुरुवातीला अॅम्पी थिएटर आहे. या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांच्या रोबोमार्फत नागरिकांचे स्वागत करून ट्रॅफिक गार्डनची माहिती दिली जाते. कार्यालयाशेजारील हॉलमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांच्या ध्वनिचित्रफिती पाहता येते. मुख्य गार्डनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सायकल, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कार घेता येते. रस्त्यांवर वाहतुकीचे नियम कसे पाळावेत, याचे प्रात्यक्षिक घेता येते. वाहतूक नियमांचे फलकही सर्वत्र लावले आहेत. गार्डनमध्ये दोन ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल तयार केले आहेत. येथे प्रात्यक्षिकांतून वाहतूक नियमांची माहिती मिळते.