नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप : संजय मंडलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 06:39 PM2021-07-28T18:39:38+5:302021-07-28T18:41:32+5:30
Kolhapur Flood : दक्षिण महाराष्ट्र हा धरणांचाच प्रदेश आहे. परंतु, कोणत्याही धरणातून पाणी सोडलेले नसतानाही केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या अडथळ्यामुळेच यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप आहे, असे स्पष्ट मत कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.
गडहिंग्लज : दक्षिण महाराष्ट्र हा धरणांचाच प्रदेश आहे. परंतु, कोणत्याही धरणातून पाणी सोडलेले नसतानाही केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या अडथळ्यामुळेच यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप आहे, असे स्पष्ट मत कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.
बुधवारी (२८) खासदार मंडलिक यांनी गडहिंग्लज शहरासह अरळगुंडी, कडलगे, नांगनूर, हिटणी, निलजी, हेब्बाळ, दुंडगे, जरळी, इंचनाळ व ऐनापूर येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, त्यांनी गडहिंग्लज नगरपालिकेत पत्रकारांशी संवाद साधला. घरांच्या आणि पिकांच्या नुकसान भरपाईत एकही माणूस शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
मंडलिक म्हणाले, सातारा ते कागलपर्यंतच्या सहापदरी महामार्ग रूंदीकरणासंदर्भात पालकमंत्र्यांसमवेत आपण संबंधित गावांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूचनांमधूनही राष्ट्रीय महामार्ग हेच महापुराचे प्रमुख कारण असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे महामार्ग रूंदीकरणाच्यावेळी त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्गाबरोबरच पूररेषेतील अनधिकृत बांधकामांमुळेच कोल्हापूर शहराला महापुराचा फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पूरबाधित क्षेत्रात बांधकामे होणार नाहीत याची दक्षता महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी घ्यायला हवी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हा संशोधनाचा भाग..!
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ७०० कोटीच्या मदतीची घोषणा केली आहे. परंतु, ही मदत २०१९ च्या पुराची की यावर्षीच्या पुराची आहे हा संशोधनाचा भाग आहे, अशी टीप्पणीही खासदार मंडलिक यांनी यावेळी केली.
अधिकाऱ्यांचे अभिनंदन..!
महापुराच्या काळात पूरबाधित गावांना प्रत्यक्ष भेटी देवून लोकांचे मनोबल उंचावण्याचे काम गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी व तहसिलदारांनी केले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असेही मंडलिक यांनी यावेळी आवर्जून सांगितले.