कुपवाडमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेस प्रारंभ
By admin | Published: April 22, 2015 12:42 AM2015-04-22T00:42:33+5:302015-04-22T00:54:19+5:30
मॅटचा पहिल्यांदाच प्रयोग : देशातील तीस संघ सहभागी; विद्युतझोतात होणार सामने
सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथे राष्ट्रीय खो-खो स्पर्धेस शानदार प्रारंभ झाला. देशभरातील तीस संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मॅटवर विद्युतझोतात सामने घेण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मदन पाटील होते.
यावेळी रामराजे म्हणाले, खो-खो हा जुना मैदानी खेळ आहे. तो जपला पाहिजे. पुढील वर्षी फलटणमध्ये अशीच भव्य स्पर्धा घेतली जाईल. मदन पाटील म्हणाले, सांगलीला खेळांची परंपरा आहे. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या क्रीडावैभवात भर घातली आहे. उद्घाटनप्रसंगी धनगरी ढोल, नृत्याविष्कार व जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके झाली. देशभरातून आलेल्या खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली. मानवंदना देण्यासाठी आलेल्या संघांचे नेतृत्व देवाप्पा चिपरीकर व डॉ. सुहास व्हटकर यांनी केले.
नगरसेवक गजानन मगदूम यांनी स्वागत केले, विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. देवेंद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील, माजी आ. प्रा. शरद पाटील, खो-खो फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव सुरेश शर्मा, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, संजय भोकरे, दीपक सूर्यवंशी, प्रा. जहाँगीर तांबोळी, प्राचार्य एन. एम. भैरट, माजी महापौर किशोर जामदार, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
भारतीय खो-खो महासंघ, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने शिवप्रेमी मंडळाने २६वी राष्ट्रीय किशोर-किशोरी आणि २५वी राष्ट्रीय पुरुष महिला फेडरेशन महापौर चषक या स्पर्धेचे आयोजन केले आहे. २५ एप्रिलपर्यंत कुपवाडमधील अकुज ड्रिमलॅण्ड मैदानावर ही स्पर्धा होईल. (वार्ताहर)