कदमवाडी : लाइन बझार येथील सेवा रुग्णालयास आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील लक्ष योजनेअंतर्गत रुग्णालयातील प्रसूती व शस्त्रक्रिया विभागास राष्ट्रीय पातळीवरील मानांकन प्राप्त झाले. रुग्णालयाचे मूल्यांकन आभासी पद्धतीने २७ फेब्रुवारी रोजी झाले होते. यामध्ये गरोदर मातेस प्रसूतिपूर्व, प्रसूतीदरम्यान, प्रसूतिपश्चात तसेच प्रसूती शस्त्रक्रियाविषयक सेवा-सुविधा कशा पद्धतीने दिल्या जातात याचा अंतर्भाव होता. या मूल्यांकनात सेवा रुग्णालय दर्जेदार ठरले असून, प्रसूती विभागाला ८८.९५ टक्के गुण प्राप्त होऊन गोल्ड कार्ड तर प्रसूती शस्त्रक्रिया विभागास ९२.२५ टक्के गुण प्राप्त होऊन प्लॅटिनम कार्ड प्राप्त झाले. हे मूल्यांकन प्राप्त होण्यासाठी डॉ. अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हर्षला वेदक, जिल्हा गुणवत्ता समन्वयक डॉ. संदीप पाटील, रुग्णालयातील सर्व कर्मचारी, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
कोट : राष्ट्रीय पातळीवरील मानांकनामध्ये रुग्णालयातील सर्व डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे योगदान असून, या मानांकनामुळे रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
डाॅ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक.
चौकट : मूल्यांकनामध्ये सर्व्हिस प्रोव्हिजन, पेशंट राइट, इनपुट, सपोर्ट सर्व्हिस, क्लिनिकल सर्व्हिस, इन्फेक्शन कंट्रोल, क्वालिटी मॅनेजमेंट व आऊटकम या बाबींचा समावेश होता.
फोटो :
ओळ. ११ बावडा सेवा हॉस्पिटल
सेवा रुग्णालयास आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील लक्ष योजनेअंतर्गत रुग्णालयातील प्रसूती व शस्त्रक्रिया विभागास राष्ट्रीय पातळीवरील मानांकन प्राप्त झाले असून, या रुग्णालयातील सुसज्ज ऑपरेशन थिएटर व शस्त्रक्रिया विभाग.
(छाया- दीपक जाधव)