जयसिंगपूर रेल्वेस्थानकाला छावणीचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:26 AM2021-09-21T04:26:16+5:302021-09-21T04:26:16+5:30
जयसिंगपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांना जयसिंगपूर रेल्वेस्थानकावरच रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे या परिसराला पोलीस ...
जयसिंगपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांना जयसिंगपूर रेल्वेस्थानकावरच रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पहाटेपासूनच पोलीस प्रशासनाबरोबर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याठिकाणी हजेरी लावली होती.
भाजपचे माजी खासदार सोमय्या यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदी आदेश लागू केला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले रेल्वेस्थानक असलेल्या जयसिंगपूर स्थानकावर सोमय्या यांना ताब्यात घेण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, दत्तात्रय बोरिगिड्डे, नायब तहसीलदार संजय काटकर यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व महसूल कर्मचारीदेखील उपस्थित होते. दरम्यान, सोमय्या हे जिल्ह्यात येण्यापूर्वीच त्यांना कराड येथे रोखण्यात आल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ थांबली. मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचा निषेध करण्याची तयारी ठेवली होती. जयसिंगपूरहून महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूरकडे गेल्यानंतरच पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला.