जोतिबाच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ, नागवेली पानातील महापुजा बांधून घटस्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 11:47 AM2022-09-26T11:47:36+5:302022-09-26T19:27:28+5:30
नवरात्रोत्सवमध्ये दख्खनचा राजा श्री जोतिबाची वेगवेगळ्या सोहन कमल पाकळ्यांतील महापूजा बांधल्या जातात
दत्तात्रय धडेल
जोतिबा : श्री जोतिबा देवाच्या नवरात्रोत्सवास आज, सोमवार पासून प्रारंभ झाला. जोतिबाची नागवेली पानातील महापुजा बांधून घटस्थापना करण्यात आली.
नवरात्रोत्सवमध्ये दख्खनचा राजा श्री जोतिबाची वेगवेगळ्या सोहन कमल पाकळ्यांतील महापूजा बांधल्या जातात. त्या प्रत्येक पाकळीस महत्व आहे. पाच पाकळ्यांपैकी तीन पाकळ्या श्री जोतिबाचा त्रिदेवात्मक अवतार दर्शवितात. खालील दोन पाकळ्या कमळपुष्पाचे द्विदल आहे. हे मनातील सगुण व निर्गुण भावांचे प्रतीक आहे. श्री केदारनाथांनी, कमळभैरव नवरात्रोस्तव सोहळ्यात पूजेसाठी काशीहून सुवर्णकमळ आणून देत अशी आख्यायिका आहे. त्याच्या आधारे कपड्यांच्या रंगीत कमळ पाकळ्या करून या महापूजा बांधतात.
आज, सोमवारी मंगलमय वातावरणात पहिल्या दिवशी तुतारी, ढोल, सनई, शिंग, ताशा या वाद्यांच्या निनादात मुख्य मंदिरात घटस्थापनेचा विधी होईल. सलग नऊ दिवस जोतिबा ते यमाई मंदिर मार्गावरून धुपारती सोहळा निघेल. रविवारी २ ऑक्टोबरला जोतिबाचा जागर होणार आहे. नवरात्र काळात जोतिबाचा जागर हा सातव्या दिवशी असतो. दोन लाख भाविक जागरा दिवशी डोंगरावर येतात. या दिवशी मंदिर चोवीस तास खुले असते.
अंबारीतील वैशिष्ट्यपूर्ण महापूजा
चार मुक्तीचे प्रतीक म्हणून जोतिबा देवाची सोहन कमलपुष्पातील दख्खनचा राजा रूपातील अलंकारीत बैठी महापूजा बांधण्यात येते. जगारानिमित्त मुख्य मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. ५ ऑक्टोबरला विजयादशमी दिवशी (दसरा) श्रींची अंबारीतील वैशिष्ट्यपूर्ण महापूजा बांधण्यात येते. ही पूजा वर्षातून एकदा बांधण्यात येते. सायंकाळी साडेपाच-सहा वाजता येथील दक्षिण दरवाजावर सीमोल्लंघनाचा सोहळा होतो. नवरात्रोस्तवाची सांगता जोतिबा डोंगरावर ललित सोहळ्याने होते. श्रींची गरुडारूढ अशी महापूजा बांधली जाते.
चार महिने पोहाळे गावात वास्तव्यास असणारे जोतिबा देवाचे मानाचे उंट, घोडे जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहे. मंदिर शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .