‘राष्ट्रवादी’च्या उमेदवार चर्चेला फुलस्टॉप : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:09 AM2019-01-08T01:09:25+5:302019-01-08T01:13:01+5:30
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे; परंतु कार्यकर्त्यांनी या चर्चेला आता फुलस्टॉप द्यावा व पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्यास प्रचंड मतांनी निवडून आणावे असे आवाहन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे; परंतु कार्यकर्त्यांनी या चर्चेला आता फुलस्टॉप द्यावा व पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्यास प्रचंड मतांनी निवडून आणावे असे आवाहन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केले. उमेदवार कोण याबद्दलची संदिग्धता मात्र त्यांनी कायम ठेवल्याने कार्यकर्त्यांत तिथेच चर्चा सुरू झाली. मुंबईत झालेल्या बैठकीत आपणही ही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर केलेल्या या आवाहनाबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पक्षातर्फे काढण्यात येणारी राज्यव्यापी ‘परिवर्तन यात्रा’ २७ जानेवारीला येथे येणार आहे. त्याच्या तयारीसाठी ताराबाई पार्क येथील कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. महापौर सरिता मोरे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजेश लाटकर, महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती संगीता पाटील, आदी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. उमेदवारीवरून जो काही वाद झाला ते आपल्या घरातील भांडण होते. उमेदवारी कुणाला द्यायची याचे सर्व अधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आहेत, त्यामुळे ते कुणाला उमेदवारी देतील, त्याच्या पाठीशी ठामपणे राहू, हाडाची काडे व रक्ताचे पाणी करून त्याला प्रचंड संख्येने निवडून आणू.
पक्षाच्या स्थापनेपासून पाचवेळा राष्टÑवादी कॉँग्रेसचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार झाला आहे. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचा अपवाद वगळता एकदाही अन्य कोणत्याच पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून विजयी झालेला नाही. त्यामुळे यावेळेलाही राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी शंका न बाळगता कामाला लागावे.’
...तर पालकमंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू
आॅगस्ट ते आॅक्टोबर या काळात शेतकऱ्यांकडे पैसे असतात, त्यामुळे ३० हजार भरणाºयांना तीन हजार परतावा व ५० हजार भरणाºयांना ५ हजार परतावा व्याजाच्या माध्यमातून वेतन म्हणून शेतकºयाला दिले जातील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले आहे; परंतु हे पैसे भरणे शेतकºयांना शक्य होणार नाही, ते पालकमंत्र्यांनी भरल्यास त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे आव्हान मुश्रीफ यांनी दिले.
उद्धव ठाकरेंचे कौतुक
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात दौरे केले. यावेळी त्यांना कर्जमाफी झालेला शेतकरी भेटला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारमध्ये असून त्यांनी अशा पद्धतीने सत्य बोलणे हे कौतुकास्पद आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
पाच राज्यांतील पराभवाने भाजप हतबल
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाने भाजप हतबल झाला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही चुनावी जुमले करून खोटी आश्वासने दिली जाणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहून भाजपचा हा खोटारडेपणा जनतेसमोर आणण्याचे काम करावे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.