कोल्हापूर : राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही, कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सार राज्य खड्यात आडकले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. राज्यावर साडे चार लाख कोटीचे कर्जाचा बोजा आहे, त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत भाजप सरकार चले जाव, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.
राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हल्लाबोल’ मोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. दसरा चौकातून सुरू झालेल्या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात सभेत रूपांतर झाले.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, सरकारच्या धोरणाने गरीब माणूस भरडला जात असून कर्जमाफीचा तर अक्षरशा बट्याबोळ केला आहे. राज्य व केंद्र सरकार सामान्य माणसाची पिळवणूक करत असून कर्जमाफीत काहीच हातात पडले नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
आश्वासनापलिकडे या सरकारने काहीच दिले नसून लबाड सरकारला खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर हसिना फरास, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेश लाटकर, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील, भैया माने, चंगेजखान पठाण, अनिल साळोखे, मधूकर जांभळे, रामराजे कुपेकर, संगीता खाडे, आदिल फरास, सतीश पाटील आदी उपस्थित होते.
उध्दवजी आता जोडे हाणाच
शिवसेना सत्तेला चिकटून बसली असून सत्तेचा मोह सुटत नाही. सत्तेत राहायचे आणि राज्यभर सरकारविरोधात भूमिका घ्यायचे हे आता त्यांनी बंद करावे. चांगला कारभार केला नाहीतर जोडे मारू, असे उध्दव ठाकरे म्हणाले होते, आता त्यांनी जोडे मारण्याची वेळ असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
अन कामात झिरो!चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील शेतकरी तानाजी खोत यांनी कर्जमाफीचे वाभाडे काढले. ‘आॅनलाईन कर्जमाफी कसली हीतर वाट लावीन’ आहे. सरकार जाहीरातीत हिरो पण कामात झिरो असल्याचे त्यांनी सांगितले.
सगळीच यंत्रणा किडली
निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकासह कोणीच नसल्याने हसन मुश्रीफ संतापले. अगोदर सांगूनही कोणीच उपस्थित राहत नसेल तर काय म्हणावे, काय करणार येथे वर पासून खालीपर्यंत यंत्रणाच किडल्याचे सांगितले.