करवीरमध्ये राष्ट्रवादीवर ‘नजरा’

By Admin | Published: October 2, 2014 12:33 AM2014-10-02T00:33:37+5:302014-10-02T00:37:50+5:30

चुरशीची तिरंगी लढत : बदललेल्या समीकरणामुळे प्रस्थापितांचा कस लागणार

NCP's 'Najra' in Karveer | करवीरमध्ये राष्ट्रवादीवर ‘नजरा’

करवीरमध्ये राष्ट्रवादीवर ‘नजरा’

googlenewsNext

राजाराम लोंढे--कोल्हापूर-करवीर विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंचरंगी लढत होत असली तरी खरी लढत तिरंगीच होणार आहे. बदललेल्या समीकरणामुळे येथे प्रस्थापितांचा कस लागणार असून, ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसवर शेवटपर्यंत सर्वांच्या नजरा लागणार, हे निश्चित आहे.
शिवसेनेकडून चंद्रदीप नरके, कॉँग्रेसकडून पी. एन. पाटील, जनसुराज्य-शेकापकडून राजेंद्र सूर्यवंशी, भाजपकडून केरबा चौगुले, तर ‘मनसे’कडून अमित पाटील, बहुजन पक्षाकडून भगवान कांबळे यांच्यासह दोन अपक्ष रिंगणात आहेत. गेले दीड -पावणेदोन महिने पाटील, नरके, सूर्यवंशी यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. या उमेदवारांच्या आतापर्यंत प्रचाराच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या आहेत. केरबा चौगुले व अमित पाटील यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने त्यांनी आता प्रचारास सुरुवात केली आहे. गेल्या वेळेला अशीच तिरंगी लढत झाली होती; पण समीकरणे वेगळी होती. ‘जनसुराज्य’ने कॉँग्रेसला पाठिंबा दिला होता; तर भाजप सेनेबरोबर होती. आता उलटी स्थिती आहे. ‘जनसुराज्य’ने ‘शेकाप’च्या मदतीने आपला उमेदवार उभा केला असून, भाजपने सवता सुभा केल्याने येथे काटा लढत पाहावयास मिळणार आहे. आघाडीतील बिघाडीनंतर राष्ट्रवादीने येथे ताकदीचा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला; पण ‘भोगावती’ व ‘राधानगरी’तील राजकारणामुळे ऐन वेळी निर्णय बदलल्याने समीकरणे पुन्हा बदलली आहेत. राष्ट्रवादीने जनसुराज्यला पाठिंबा जाहीर केल्याने राजेंद्र सूर्यवंशी यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादीची निर्णायक ताकद आहे. यासाठी ‘भोगावती’चे सात संचालक येतात. तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे, जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांचा गटही कार्यरत आहे. राष्ट्रवादी सूर्यवंंशी यांच्यामागे ताकदीने उभी राहिली तर येथे नरके, पाटील व सूर्यवंशी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहावयास मिळू शकतो; पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मानसिकता, भोगावतीचे राजकारण पाहता, राष्ट्रवादी सूर्यवंशी यांच्यामागे एकसंधपणे राहील, अशी सध्याची तरी परिस्थिती नाही. परिस्थितीचा अंदाज घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंतिम क्षणी ‘शिवधनुष्य’ हातात घेतला तर आश्चर्यही वाटायला नको. राधानगरी तालुक्यात एकास एक लढतीसाठी झालेले प्रयत्न पाहता, येथे पी. एन. पाटील यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी शर्थीचे प्रयत्न करणार, हे निश्चित आहे. राष्ट्रवादीने आपली भूमिका जाहीर केली असली तरी शेवटपर्यंत सर्वच पक्षांच्या राष्ट्रवादीवर ‘नजरा’ राहणार आहेत. दरम्यान, लोकसभेत धनंजय महाडिक यांना पी. एन. पाटील यांनी मदत केली होती. त्याचे फळही महाडिक यांना मिळाले; पण आता समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादीने जनसुराज्यला पाठिंबा दिल्याने महाडिक यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यांचे समर्थक सध्या द्विधा मन:स्थितीत दिसत आहेत.

करवीर
एकूण मतदार २,८७,४८0
नावपक्ष
चंद्रदीप नरके शिवसेना
पी. एन. पाटीलकाँग्रेस
केरबा चौगुले भाजप
राजेंद्र सूर्यवंशी जनसुराज्य शक्ती
अमित पाटीलमनसे
भगवान कांबळे बसपा
अरविंद माने अपक्ष
किशोर भाटे अपक्ष

Web Title: NCP's 'Najra' in Karveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.