कोल्हापूर : राज्यातील ज्या शासकीय वैद्यकीय इमारती जुन्या झाल्या आहेत आणि ज्या ठिकाणी नवीन महाविद्यालये मंजूर झाली आहेत. या सर्व इमारती उभारण्यात येणार असून याद्ष्टिने एशियन बॅंकेशी चर्चा सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर मुश्रीफ यांनी पहिल्यांदा आज, शनिवारी दुपारी सीपीआर रूग्णालयाला भेट देऊन आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, प्रभारी अधीष्ठाता डॉ. आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिय देशमुख, अधीक्षक डाॅ. गिरीष कांबळे उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, सध्याची इमारत जुनी आहे. जागाही कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी विस्तारीकरणाला मर्यादा आहेत. म्हणूनच सुमारे ८०० कोटी रूपये खर्च करून नवे रूग्णालय आणि आवश्यक इमारती उभारल्या जातील. याच पध्दतीने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्याही इमारती उभारण्यात येतील. कायदा करावा लागेलशासकीय शिष्यवृत्ती घेवून वैद्यकीय शिक्षण घेणारेही अनेक डॉक्टर्स हे खासगी प्रॅक्टिसमध्ये अधिक पैसे मिळत असल्याने शासकीय रूग्णालयांमध्ये सेवा देण्यास उत्सुक नसतात. जर शासनानेच तुमच्या शिक्षणासाठी खर्च केला आहे तर तुम्ही किमान पाच वर्षे तरी सेवा दिली पाहिजे. यासाठी कायदाच करावा लागेल असेही मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
आवश्यक वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारती उभारणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
By समीर देशपांडे | Published: July 22, 2023 7:03 PM