कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर सामाजिक, आर्थिक , शैक्षणिक, शेती, सहकार अशा सर्वच क्षेत्रांत राबविण्यात आलेल्या धोरणांमुळे मूलभूत प्रश्न तर सुटले नाहीतच; परंतु नवे प्रश्न निर्माण झाले. त्यांची सोडवणूक करण्यासाठी समकालीन प्रश्नांची पुनर्मांडणी आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले.येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे मंगळवारी आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते ‘समकालीन सामाजिक प्रश्न : कारणे व उपाय’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर होते.संपादक भोसले म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासाची धोरणे ठरविली गेली. कालांतराने त्यांत निर्माण झालेले दोष दूर न करता ती अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आली. त्यामुळे समाजात नकारात्मक भूमिका तयार झाली. सत्तरच्या दशकात गावपातळीवरील विकास सोसायट्यांमुळे एक दिशा मिळाली; परंतु या सोसायट्या समृद्ध न होता राजकारणामुळे त्यांना उतरती कळा लागली. सामुदायिक शेतीही मागे पडत गेली. विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून पाहिलेल्या सहकार क्षेत्राचीही तीच अवस्था झाली. शिक्षणाचे खासगीकरण झाल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले. पायाभूत सुविधांचा विकास न झाल्याने नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी सुप्त स्थलांतर होत आहे. नव्या संधींसाठी, शिक्षणासाठी आपला प्रदेश अपुरा आहे, असे वाटत असल्याने मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशा ठिकाणी स्थलांतर झाल्याने राजकीय भूगोलही बदलत आहे. शिक्षणावर अधिक खर्च व्हायला हवा होता. तसा आग्रह झाला नाही; त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला असेही ते म्हणाले.अध्यक्षीय भाषणात शिपूरकर म्हणाले, प्रत्येक ठिकाणी धर्माची घुसखोरी, मोबाईलसारख्या माध्यमाचा समाजविघटनासाठी वापर, श्रद्धा-अंधश्रद्धांचं समर्थन करीत राजसत्तेत धर्मसत्तेचा होत असलेला शिरकाव हे समकालीन महत्त्वाचे प्रश्न आहेत. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी यांनी ‘भारतीय राज्यघटना व लोकशाही’, शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे यांनी ‘आरक्षण : वास्तव व अपेक्षा’ या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रा. मच्छिंद्र सकटे होते. दरम्यान, कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतून आलेल्या ६० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापकांनी शोधनिबंधांचे वाचन केले. प्रा. बाबासाहेब नदाफ यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. एम. के. कन्नाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी फिडेल कॅस्ट्रो यांच्या स्मरणार्थ तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन झाले.
समकालीन प्रश्नांची पुनर्मांडणी आवश्यक
By admin | Published: January 11, 2017 12:40 AM