गडहिंग्लज : शेतकर्यांसह गावाच्या सोयीसाठीच पाणंद रस्ते आहेत. त्याच्यावर कोणाचीही खाजगी मालकी नाही.त्यावरील अतिक्रमणे दूर करून पाणंदी आनंदी करण्यासाठी लोकचळवळीची गरज आहे,असे मत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी व्यक्त केले.महाराजस्व अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील पाणंद खुली करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. तहसिलदार दिनेश पारगे, पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे यांची प्रमुख उपस्थिती होती.पांगारकर म्हणाल्या, पाणंद रस्ते खुली करण्यासाठी सरपंच, प्रतिष्ठित नागरीक, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांची भूमिका महत्वाची आहे.त्यासाठी सर्वांना एकत्र आणा. वादाच्या ठिकाणी मोजणी करुन घ्या. याप्रसंगी कांही सरपंचानी गावातील पाणंद रस्ते खुली करण्यासंदर्भात निवेदनेही दिली.चर्चेत विकास मोकाशी, रवींद्र घेज्जी, प्रशांत देसाई, रामचंद्र पाटील यांनी सहभाग घेतला. बैठकीस निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील,नायब तहसीलदार विष्णू बुटे, सरपंच, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवू.....!पाणंद रस्त्यासह गायरानातील अतिक्रमणासारखे अनेक प्रश्न गावा-गावांमध्ये आहेत. ज्या समस्या सहज सुटणार्या आहेत त्या तातडीने सोडवू, त्यानंतर एकएक गाव घेवून तेथील प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवूया असेही पांगारकर यांनी सांगितले. याकडे काळजीपूर्वक पहा.....!कांही पाणंद रस्ते दोन किंवा तीन गावांना जोडलेले आहेत. शहरालगतच्या गावातील पाणंद रस्ते शहराशी किंवा मोठ्या रस्त्यांशी जोडले आहेत, असे रस्ते खुली करताना भविष्यकालीन वापर लक्षात घेवून ते काळजीपूर्वक खुली करा,अशी सूचनाही पांगारकर यांनी केली.'लोकमत'इम्पॅक्ट..!गडहिंग्लज तालुक्यातील सुमारे ८० पाणंद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात असून त्यासाठी खास मोहीम राबविण्याची गरज आहे. असे वृत्त 'लोकमत'ने शुक्रवारी (१२) प्रसिद्ध केली होते.त्याची दखल घेऊन महसूल खात्याने महाराजस्व अभियांतर्गत अतिक्रमित पाणंदी खुली करण्याची मोहीम आखली आहे.बुधवार (१७) रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याहस्ते या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे.