कोल्हापूर : काठमांडू येथे या वर्षीची दक्षिण आशियाई स्पर्धा होणार आहे. त्यात सहभागी होणारे नेपाळच्या मुला-मुलींचे कबड्डी संघ सरावासाठी शिवाजी विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठ आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतील संघांसमवेत नेपाळचे संघ सराव करणार आहेत, प्रशिक्षण घेणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांनी दिली.दक्षिण आशियाई स्पर्धा दि. १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कबड्डीतील नवतंत्रज्ञान, कौशल्यांचे प्रशिक्षण घेण्यासह सराव आणि तयारी करण्याकरिता नेपाळमधील मुले आणि मुलींचा संघ शिवाजी विद्यापीठात आला आहे. मुलांच्या संघात १६, तर मुलींच्या संघामध्ये १४ खेळाडूंचा समावेश आहे.
हे खेळाडू १८ ते २७ वयोगटातील आहेत. या संघांचा रोज सकाळी सराव घेतला जाईल. त्यांना कबड्डीतील नवतंत्रज्ञान, कौशल्यांची माहिती दिली जाईल. त्यांना माझ्यासह उमा भोसले-भेंडीगिरी, ओंकार पायगुडे, सागर खटाळे, आदी मार्गदर्शन करतील. खेळातील गती आणि क्षमता वाढविण्याबाबत सुहास सोळंकी मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारनंतर या संघांचे सराव सामने घेण्यात येतील. विद्यापीठासह शाहू कॉलेज, इस्लामपूर येथील कन्या महाविद्यालय, आदींसमवेत सामने होतील. नेपाळमधील दोन्ही संघ मंगळवारी दुपारी विद्यापीठात दाखल झाले आहेत. विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडासंकुलात प्रशिक्षण सुरू झाले. दि. २१ नोव्हेंबरला हे संघ मुंबईला रवाना होतील, असे प्रशिक्षक भेंडीगिरी यांनी सांगितले.संघांना वेगळा अनुभव, ज्ञानयापूर्वी तीन वेळा थायलंडचा कबड्डी संघ सरावासाठी शिवाजी विद्यापीठात आला होता. येथील सरावाचा या संघांना चांगला उपयोग झाला. अन्य देशांतील संघ विद्यापीठात सरावासाठी आल्याने दोन्ही देशांतील संघांमध्ये एकमेकांचे ज्ञान, खेळातील तंत्र, कौशल्यांबाबतच्या माहितीचे आदानप्रदान होते आणि अनुभव मिळतो, असे प्रशिक्षक भेंडीगिरी यांनी सांगितले.
संघांची भक्कम तयारी करण्याच्या उद्देशाने आम्ही विविध ठिकाणच्या संघांसमवेत सराव करीत आहोत. त्याअंतर्गत शिवाजी विद्यापीठात आलो आहोत. याठिकाणी नवीन कौशल्य, ज्ञान आमच्या खेळाडूंना निश्चितपणे मिळेल.- कृष्णदेव पानता, संघव्यवस्थापक, नेपाळ.