महापालिकेने घेतल्या नव्या ६५ ॲटो टिपर रिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:28 AM2021-08-20T04:28:08+5:302021-08-20T04:28:08+5:30
भारत चव्हाण कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्यसेवेत येत्या काही दिवसांत नव्या ६५ ऑटो टिपर गाड्या दाखल होत आहेत. जुन्या १०४ ...
भारत चव्हाण
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्यसेवेत येत्या काही दिवसांत नव्या ६५ ऑटो टिपर गाड्या दाखल होत आहेत. जुन्या १०४ गाड्यांसह नव्या ६५ गाड्या उपलब्ध होताच शहरात कोठेच कचरा कोंडाळे पाहायला मिळणार नाहीत. प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे ऑटो टिपरद्वारे रोजचा कचरा घरातूनच उठाव केला जाणार आहे.
महानगरपालिका आरोग्य विभागाची कचरा उठाव मोहीम अधिक सक्षम, तसेच गतिमान करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरोग्य विभागाच्या ताफ्यात जुन्या १०४ ऑटो टिपर आहेत. नवीन ६५ ऑटो टिपर खरेदी करण्यात आल्या आहेत. चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या ३ कोटी ७० लाखांच्या निधीतून त्या घेतल्या आहेत. सध्या शहरातील २३ प्रभागांत प्रत्येकी दोन ऑटो टिपर, तर ५७ प्रभागांत प्रत्येकी एक ऑटो टिपर गाड्या देण्यात आल्या आहेत. काही प्रभागांत दोन दिवसांतून एकदा कचरा उठाव केला जात आहे. नव्या ऑटो टिपर गाड्या आरोग्य ताफ्यात येताच प्रत्येक प्रभागाला दोन याप्रमाणे त्याचे वाटप होईल. सर्वच प्रभागांत रोज कचरा उठाव केला जाईल. यापुढे शहरात कोणत्याही भागात कचरा कोंडाळे असणार नाहीत. घरातील कचरा थेट कचरा डेपोवर जाईल.
-दोन स्विपिंग मशीन घेणार -
शहरातील गल्लीबोळ, चौक साफ करण्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांचा वापर केला जातो; परंतु मोठे तसेच प्रमुख रस्ते साफ करणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. म्हणून प्रमुख रस्ते स्वच्छ करण्याकरिता दोन स्विपिंग मशीन भाड्याने घेण्यात येणार आहेत. या दोन्ही मशीनना प्रत्येक दिवशी सत्तर किलोमीटर रस्ते दोन्ही बाजूने साफ करावे लागणार आहेत.
-
-११ आरसी वाहने, मात्र बंद स्थितीत -
महापालिकेने कचरा कोंडाळ्यातील कचरा उठाव करण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी १४ आरसी वाहने घेतली होती. त्यातील सध्या तीन आरसी वाहने चालू स्थितीत आहेत. बाकीची सर्व बंद आहेत. शहरातील कोंडाळे काढले जाणार असल्यामुळे पुढील काळात या वाहनांचा वापर होणार नसल्याने त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
कोट -
ऑटो टिपर गाड्या आल्यानंतर रस्त्यातील कचरा कोंडाळे हटविले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी यापुढे आपल्या घरातील कचरा हा ऑटो टिपर गाड्या येताच त्यांच्याकडे द्यावा. रस्त्यावर कचरा टाकू नये.
जयवंत पवार, मुख्य आरोग्य निरीक्षक