कोल्हापूर : प्रस्थापितांच्या तब्बल तीन दशकांच्या सत्तेला सुरूंग लावत गोकुळची हंडी फोडल्यानंतर आता नवीन अध्यक्ष निवडून कारभाराला सुरुवात करण्यासाठी येत्या शुक्रवारचा अक्षयतृतीयेचा मुहूर्त काढण्यात आला आहे. याची पूर्वतयारी म्हणून आज, शुक्रवारी कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये सर्व प्रमुख नेत्यांसमवेत नूतन संचालकांची बैठक ११ वाजता होत आहे. तिथे नव्या अध्यक्षाच्या नावावर चर्चा होणार आहे.
संघामध्ये सत्तांतर झाल्यानंतर अध्यक्ष निवड कधी होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ही निवड येत्या शुक्रवारी अक्षयतृतीयेला व्हावी असे पत्र सत्ताधारी आघाडीकडून निवडणूक विभागास देण्यात आले आहे. त्यामुळे त्याच दिवशी ही निवड होणार, हे निश्चित झाले. त्याबाबतची चर्चा करण्यासाठी सत्ताधारी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीत नूतन संचालकांच्या सत्काराबरोबर तीन स्वीकृत सदस्यांबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. अध्यक्ष निवडीसह शाहू शेतकरी आघाडीचा संघातील कारभाराचा पॅटर्न काय असेल याबाबतचे धोरणही यामध्ये निश्चित केले जाणार आहे. बैठकीस आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
चौकट -
विश्वास पाटील यांना संधी शक्य
ऐतिहासिक सत्तांतरानंतर गोकुळचा पहिला अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आहे. ज्येष्ठत्व व अनुभवाच्या जोरावर विश्वास नारायण पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. विरोधी आघाडीतून तब्बल १४ लोक प्रथमच निवडून आले आहेत. त्यांना संघाच्या व्यवहाराबद्दल कांहीच माहिती नाही. त्यातील काही तरी अजून एकदाही संघाच्या कार्यालयात गेलेले नाहीत. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून विश्वास पाटील परिचित आहेत. नव्या संचालकांना सोबत घेऊन जाऊन काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांना संधी मिळू शकते. त्यांना पहिल्यांदा संधी देऊन पुढच्या टप्प्यात अरुण डोंगळे यांचा विचार होण्याची शक्यता जास्त दिसते.