कोल्हापूर : प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) कोल्हापुरातील विविध केंद्रांवर रविवारी पार पडली. नव्या नियमानुसार कोल्हापूर केंद्रावरून ४०५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापक पदासाठी ‘नेट’ परीक्षा उत्तीर्णतेची पात्रता निश्चित केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डद्वारे (सीबीएसई) कोल्हापूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर रविवारी परीक्षा घेण्यात आली.सकाळी साडेनऊ ते साडेदहा आणि सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत दोन पेपर घेण्यात आले. त्यातील पहिल्या पेपरमध्ये ५० प्रश्न हे शंभर गुणांसाठी होते. दोनशे गुणांच्या दुसऱ्या पेपरसाठी शंभर प्रश्न होते.
या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सायबर इन्स्टिट्यूट, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, विबग्योर स्कूल, शांतीनिकेतन, शाहू विद्यालय (न्यू पॅलेस), एस. एम. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विवेकानंद महाविद्यालय, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, न्यू मॉडेल स्कूल, कोल्हापूर पब्लिक स्कूल अशी परीक्षा केंद्रे होती.रविवारची सुट्टी असूनही परीक्षा केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांचा परिसर विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलला होता. या परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्रावरून ५०६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४०५० जणांनी परीक्षा दिली. जिल्ह्यात शांततेत परीक्षा पार पडली, अशी माहिती कोल्हापूर केंद्राच्या समन्वयक जयश्री जाधव यांनी दिली.दरम्यान, काही विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर परीक्षेची दिनांक ८ जुलै ऐवजी ८ नोव्हेंबर अशी प्रसिद्ध झाली होती. विवेकानंद महाविद्यालयातील केंद्रावरील काही परीक्षार्थींच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी त्याची माहिती केंद्रसंचालकांना दिली. या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मात्र, कोणतीही अडचण आली नाही.