कोल्हापुरातून रात्रीची विमानसेवा होणार सुरू, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 03:37 PM2022-07-27T15:37:38+5:302022-07-27T15:38:13+5:30
एअर बससारखी मोठी विमाने या विमानतळावर उतरू शकतील
कोल्हापूर : नाईट लँडिंग सुविधा आणि विस्तारित धावपट्टीला भारतीय नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने आता कोल्हापुरातून रात्रीची विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी दिली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून कोल्हापूरविमानतळावर नाईट लँडिंग सुविधेला मंजुरी मिळाली. विमानतळावरील धावपट्टी १३७० मीटरवरून १९३० मीटर इतकी विस्तारित झाली आहे. त्यामुळे एअर बससारखी मोठी विमाने या विमानतळावर उतरू शकतील. या विस्तारित धावपट्टीला नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने मंगळवारी मान्यता दिली. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन त्यांना कोल्हापूर विमानतळाच्या गरजांची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या विमानतळावरील ॲप्रन, टॅक्सी-वे, आयसोलेशन-वे उभारण्यास तत्काळ मंजुरी दिली. त्यानंतर नाईट लँडिंग, विस्तारित धावपट्टीला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन आणि केंद्रीय मंत्री सिंधिया यांच्या सकारात्मकतेमुळे कोल्हापूरचा महत्त्वाचा विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग, पर्यटनाला चालणार मिळणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूर-मुंबई नियमित सेवेसाठी प्रयत्नशील
कोल्हापूर - मुंबई दैनंदिन विमानसेवेसह अन्य मार्गांवर विमान उड्डाण सुरू व्हावे. रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी. विमानतळाची नवी इमारत लवकर पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
विकासाला चालना मिळणार
नाईट लँडिंग, धावपट्टी विस्तारीकरणामुळे कोल्हापूर विमानतळ आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या सुविधांच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री सिंधिया, खासदार महाडिक यांना विशेष धन्यवाद देतो. कोल्हापूरहून विविध हवाई सेवांचा विस्तार होण्यास फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली