मिलन हाॅटेल ते बिंदू चाैकातून रात्रीचा प्रवास धोक्याचाच, झुंडींनी घेतला रस्त्यांचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:27 AM2021-09-14T04:27:43+5:302021-09-14T04:27:43+5:30
कोल्हापूर : शहरातील बहुतांश रस्त्यांसह मिलन हाॅटेल ते बिंदू चौक, मिरजकर तिकटी, हत्ती महल रोड, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, आयटी पार्क, ...
कोल्हापूर : शहरातील बहुतांश रस्त्यांसह मिलन हाॅटेल ते बिंदू चौक, मिरजकर तिकटी, हत्ती महल रोड, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, आयटी पार्क, हाॅकी स्टेडियम, मैल खड्डा चौक, देवकर पाणंद चौक, राजाराम टिंबर चौक, अशा चौकातून दुचाकीद्वारे रात्रीचा प्रवास धोक्याचाच झाला आहे. भटक्या श्वानांच्या झुंडी प्रमुख रस्ते व चौकांचा ताबा घेत असून धावत्या दुचाकीच्या मागे लागगतात. त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यांची दहशतही चांगलीच पसरली आहे.
महापालिका आरोग्य विभागाने भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी निर्बीजीकरणाचा प्रकल्पच हाती घेतला आहे. यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र डाॅक्टरांची नेमणूक केली आहे. त्याकरिता एक श्वानाच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी २८० रुपये शुल्क डाॅक्टरांना दिले जातात. आतापर्यंत ३ हजार ६५९ श्वानांचे असे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. शहरालगतच्या उपनगरे व ग्रामपंचायतींमधून भटके श्वान शहरात दाखल होऊ लागले आहेत. त्यांना चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघात होतात. या भटक्या श्वानांची दहशत इतकी झाली आहे, की अनेकजण अमुक चौकातून जायला नको, अन्य मार्गाने जाऊ, असे म्हणतात.
कुत्रे आवरा हो
महिना श्वानदंश
जानेवारी - २०
फेब्रुवारी - १०
मार्च - १५
एप्रिल - १७
मे - १३
जून - ७
जुलै - १२
ऑगस्ट - १५
या चौकांत जरा सांभाळून
शहरातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या लक्ष्मीपुरी, खाटीक मंडई चौक, मिलन हाॅटेल ते बिंदू चौक, मिरजकर तिकटी, सदर बाजार, कदमवाडी, उद्यमनगर, बालसंकुल चौक, आयटी पार्क, हाॅकी स्टेडियम, मैल खड्डा चौक, देवकर पाणंद चौक, राजाराम टिंबर चौक, पाचगाव रस्ता, आयसोलेशन रस्ता, जवाहनगर चौक, कसबा बावडा, शुगर मिल चौक, आदी चौकातून रात्री बारानंतर श्वानांच्या झुंडीकडून रस्त्याचा ताबा घेतला जातो. जवळून वेगाने दुचाकी नेली तर झुंड मागे लागते. त्यातून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
निर्बीजीकरणासाठी महापालिकेकडून सात लाख रुपये खर्च
शहरात गेल्या वर्षभरात साडेसहा हजार श्वानांची गणना महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. त्यातून ३ हजार ६५९ श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यावर ७ लाख रुपये खर्च केले आहेत. शहरालगतचा ग्रामपंचायतींकडे भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी खास निधी नाही. त्यामुळे तेथील श्वानांची संख्या वाढू लागली आहे. त्यातून ती श्वाने शहरात येऊ लागली आहेत.
चोराची नाही, कुत्र्यांची भीती वाटते
आयटी पार्कपासून निर्माण चौकापर्यंत दुचाकीवरून रात्री जाताना श्वानांच्या झुंडी रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या असतात. त्यामुळे अनेकदा रस्त्यातून मार्ग काढताना त्यातील एक श्वान भुंकले की सर्वच श्वान दुचाकीच्या मागे लागतात. त्यामुळे अगदी जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतो.
- अनंत सुतार, कोल्हापूर
प्रतिक्रिया
रात्री लक्ष्मीपुरी अथवा मिलन हाॅटेल चौकातून पुढे जात असताना रस्त्यावर किमान ३० ते ४० श्वानांच्या झुंडी बसलेल्या असतात. त्यातून मार्ग काढताना अक्षरश: घाम फुटतो. एखादे श्वान भुंकू लागले की सर्वच श्वाने मागे लागतात. त्यामुळे अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.
नितीन भोसले, कोल्हापूर
विशेषत:
वर्षभरात साडेचौदा हजार ॲन्टीरेबीज
कोल्हापूर शहरातील श्वानांना पशुसंवर्धन विभागाच्या रुग्णालयाकडून गेल्या वर्षभरात १४ हजार ४०० श्वानांना ॲटीरेबीज इंजेक्शन देण्यात आले आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरू असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. सॅम लुद्रिक यांनी दिली.