ना भाऊबीज; ना मानधन वाढ! : अंगणवाडी सेविकांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:58 PM2017-12-02T16:58:24+5:302017-12-02T17:05:42+5:30
अंगणवाडी सेविकांना दिवाळीची भाऊबीज भेट म्हणून २००० रुपये तसेच सेविकांना १५०० रुपये व मदतनिसांना १००० रुपये मानधनवाढ देण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्याची अंमलबजावणी न करता फसवणूक केली. त्यामुळे संतप्त अंगणवाडी सेविकांनी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे शनिवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून शासन निर्णयाची होळी करीत शंखध्वनी केला.
कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांना दिवाळीची भाऊबीज भेट म्हणून २००० रुपये तसेच सेविकांना १५०० रुपये व मदतनिसांना १००० रुपये मानधनवाढ देण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्याची अंमलबजावणी न करता फसवणूक केली. तसा शासन अध्यादेशही २४ नोव्हेंबरला काढण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे शनिवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून शासन निर्णयाची होळी करीत शंखध्वनी केला.
दुपारी दीडच्या सुमारास महावीर उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करीत अंगणवाडी सेविकांचा हा मोर्चा जिल्हा परिषदेवर नेण्यात आला. या ठिकाणी ठिय्या मारीत शंखध्वनी करण्यात आला.
यानंतर शासन निर्णयाची होळी करीत शासनाने फसवणूक केल्याबद्दल निषेध करण्यात आला. यानंतर मागण्यांचे निवेदन कॉ. आप्पा पाटील, जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) एस. डी. मोहिते यांना सादर केले.
अंगनवाडी सेविका व मदतनिसांना मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर होत्या. संपादरम्यान महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सेविकांना १५०० रुपये मानधनवाढ देण्याचे जाहीर केले. तसेच ६ आॅक्टोबरला मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचे मान्य केले.
दिवाळीसाठी भाऊबीज भेट पूर्वी मिळणाऱ्या १००० रुपयांवरून यामध्ये वाढ करून २००० रुपये दिवाळीपूर्वी देण्याचे मान्य केले होते; परंतु आजतागायत भाऊबीज भेट किंवा वाढीव मानधन दिलेले नाही. त्यातच भरीत भर म्हणून २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अध्यादेश काढून सेविका व मदतनिसांना पूर्वीप्रमाणे १००० रुपये भाऊबीज भेट देण्याचे जाहीर करून त्यानुसार अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
यावरून शासनाने सेविका व मदतनिसांची फसवणूक केली आहे. याचा निषेध करीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात सरिता कंदले, शमा पठाण, अर्चना पाटील, सुचित्रा शिनगारे, शोभा भंडारे, विद्या कांबळे, अंजली क्षीरसागर, सुनंदा कुराडे, आदींचा सहभाग होता.
जिल्ह्यात १० हजार सेविका व मदतनीस
जिल्ह्यात पाच हजार अंगणवाडी सेविका व पाच हजार मदतनीस आहेत. सेविकांना सध्या ५००० रुपये मानधन असून, त्यामध्ये १००० रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मदतनिसांना २५०० रुपये मानधन असून त्यांनाही १००० रुपये वाढ देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्याची पूर्तता सरकारने केलेली नाही.
मोर्चातील मागण्या
- अंगणवाडी सेविका व मदतनिसांना दरमहा किमान १८००० रुपये वेतन मिळावे.
- अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सेवानिवृत्तीनंतर किमान ३००० रुपये पेन्शन मिळाली पाहिजे.
- अंगणवाडी सेविका व मदतनिसांना दरमहा पाच तारखेपर्यंत मानधन मिळाले पाहिजे.
- अंगणवाडी सेविका व मदतनिसांना वैद्यकीय उपचार व वैद्यकीय रजा मिळाव्यात.
- ज्या अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नाहीत, त्यांना तत्काळ इमारती बांधून द्याव्यात.