लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सत्तारूढ गटातून भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राधानगरी व भुदरगडमधील भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्याकडे केली.
नाथाजी पाटील हे गेली २५ वर्षे पक्षाचे प्रामाणिकपणे काम करीत असतानाच भुदरगड तालुक्यात संस्थात्मक ताकदही वाढविली आहे. त्यांनी यापूर्वी ‘बिद्री’ साखर कारखाना प्रशासक मंडळ सदस्य व बाजार समितीचे संचालक म्हणून काम केले आहे. भाजपची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. पक्षाने सत्तारूढ गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. येथून नाथाजी पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी अलकेश कांदळकर, प्रा. हिंदुराव पाटील, संतोष पाटील, संभाजी आरडे, डॉ. सुभाष जाधव, विलास बेलेकर, भगवान शिंदे आदी उपस्थित होते.