राम मगदूम --गडहिंग्लज --गावातल्या मुलांचं शरीर तंदुरुस्त राहावं, त्यांनी खेळात नाव कमवावं, ‘खेळातून’ गावचं नाव उज्ज्वल व्हावं यासाठीच ‘बाबूदा’ हयातभर धडपडले. त्यांच्या नावाने उभारलेल्या ‘स्वागत कमानी’मुळे नव्या पिढीलाही नवी ऊर्जा मिळणार आहे. किंबहुना स्वातंत्र्यसैनिकांच्या नूल गावी बाबूदांच्या आठवणीतून खेळाचा नवा जागर सुरू झाला आहे.आप्पासाहेब आबाजी चव्हाण तथा बाबूदादा हे या क्रीडाप्रेमीचं नाव. आबाजी स्वातंत्रयसैनिक. बाबूदादानीही सैन्यात काही वर्षे देशसेवा केली. त्यानंतर त्यांनी काही वर्षे चालक-कंट्रोलर म्हणून एस. टी. खात्यात नोकरी केली. मात्र, एका संपाच्यावेळी कामगारांच्या न्यायासाठी वरिष्ठांशी हुज्जत घातल्याच्या कारणावरून त्यांची नोकरी गेली.स्वत: उत्तम खेळाडू असल्यामुळे ते दररोज न चुकता न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर असत. कबड्डी, फुटबॉल, व्हॉलिबॉल, हॉकी या सांघिक खेळांबरोबरच वैयक्तिक मैदानी खेळांसाठी सराव करणाऱ्या मुला-मुलींना ते आवर्जून मार्गदर्शन करीत. देशपातळीवर चमकलेल्या मुलींच्या हॉकी संघालाही त्यांचे मार्गदर्शन लाभले.दरम्यान, दहा वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या आठवणीशिवाय नूल पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा एकही दिवस मावळत नाही. त्यांचे सुपुत्र आनंद व जयसिंग यांनी तब्बल दोन लाख रुपये खर्चून गावातील प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारी प्रेरणादायी व सुंदर अशी स्वागत कमान बांधून त्यांची आठवण जपली आहे.कल्पकता ‘सिंबायोसिस’च्या कमानिची!हरळी येथील सिंबायोसिस स्कूलची भव्यदिव्य इमारत बाबूदांचे सुपुत्र इंजिनिअर जयसिंगराव यांनीच बांधली आहे. त्याच कल्पकतेने गावातील प्राथमिक शाळेला स्व:खर्चातून अत्यंत देखणी स्वागत कमान बांधून देऊन आपण शिकलेल्या शाळेचे पांग फेडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ओळख ‘क्रीडा प्रशिक्षक ’ म्हणूनच !राष्ट्र सेवा दलाचे सैनिक राहिलेल्या बाबूदांनी सुरुवातीला काही वर्षे समाजवादी वर्गमित्र श्रीपतराव शिंदेंसाठी, तर त्यानंतर काही वर्षे काँगे्रसचे नेते बाबा कुपेकर यांच्यासाठी काम केले. त्यासाठी प्रसंगी स्वकियांशीदेखील संघर्ष केला. मात्र, क्रीडाप्रेमी अन् क्रीडा प्रशिक्षक हीच ओळख त्यांनी आयुष्यभर जपली.
नूलमध्ये क्रीडाप्रेमी ‘बाबूदांचे’अनोखे स्मारक !
By admin | Published: June 27, 2016 10:27 PM