कोल्हापूर : पुण्यातील रोजचे साडेतीन लाख लिटर दूध वितरण व पॅकेजिंगचा गेली २६ वर्षे ठेका असलेल्या गायत्री कोल्ड स्टोअरेजचा करार का रद्द करू नये, अशी कायदेशीर नोटीस काढण्याचा ठराव मंगळवारी झालेल्या गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैेठकीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार येत्या दोन महिन्यांत कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा ठेका बदलण्यात येणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे जावई विजय ढेरे यांच्या मालकीची ही फर्म आहे.
विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळ संचालकांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीच्या विषय पत्रिकेवर कोल्ड स्टोअरेजा महत्त्वपूर्ण विषय होता. बैठकीत सर्व विषयांना मंजुरी दिली, तथापि पुण्यातील कोल्ड स्टोअरेज ठेक्याच्या बाबतीत विरोधी सदस्यांकडून काही प्रमाणात विरोध झाला. कायदेशीर अडचणी येतील अशी शंकाही व्यक्त केली गेली; पण सत्ताधाऱ्यांनी सर्व प्रक्रिया कायदेशीररित्याच केली जाणार असल्याचा खुलासा करत हा ठराव मंजूर केला.
पुण्यातील ढेरे यांच्या मालकीच्या जागेत गोकुळने पैसे खर्च करून कोल्ड स्टोअरेज उभारून दिले. मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक दुधाची विक्री होत असल्याने करार करूनच १९९५ मध्ये हा ठेका दिला गेला. करार मोडायचा असल्यास योग्य ती कायेदशीर बाबींची पूर्तता करणारी नोटीस देऊन करार संपुष्टात आणावा, असे त्यावेळीच करारात ठरले आहे. त्यानुसार नोटीस बजावण्यात आली. या फर्मकडे अपुऱ्या सुविधा आहेत. दूध पाश्चराईज्ड करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी नाही. शिवाय हे कोल्ड स्टोअरेज हडपसरला आहे. आता पिंपरी-चिंचवडमध्ये दुधाची विक्री वाढवण्याचे गोकुळचे धोरण आहे. हडपसर व पिंपरी-चिंचवड दोन भिन्न टोकांना आहेत. त्यामुळे नवीन फर्म निवडून त्यांच्याकडून वितरण व पॅकेजिंग करून घेण्याबाबत संचालक मंडळ आग्रही आहे, असे सांगण्यात आले.
ठेक्याचे गणित रोजचे १५ लाखांचे
गोकुळ दूध संघाचे पुण्यात तीन ते साडेतीन लाख लिटर रोजची दूध विक्री आहेे. दूध वितरकांचे व पॅकेजिंगचे कमिशन प्रतिलिटर पाच रुपये सरासरी धरले तरी दिवसाला किमान १५ लाख रुपये होतात. असे दरमहाचे गणित काढले तर ही रक्कम साडेचार कोटींवर जाते. गायत्री फर्मकडे तर हा ठेका १९९५ पासून आहे.
खर्च आणि भाडेही..
संबंधित वितरकाला कोल्ड स्टोअरेज उभारण्यासाठी गोकुळनेच खर्च केला आहे. जागा व कोल्ड स्टोअरेजची मालकी मात्र त्या वितरकाची आहे. त्यापोटी संघ त्यांना भाडेही देत होता. हा निर्णय झाला तेव्हा संघातील संचालक मंडळात वाद झाला होता; परंतु त्याविरोधात कुणी आवाज काढू शकले नाही. संघाने आतापर्यंत दिलेल्या भाड्याच्या रकमेतून स्वमालकीचे कोल्ड स्टोअरेज उभारले असते.
गोकुळ शिरगावमध्ये पेट्रोल पंप
उत्पन्न वाढीसाठी म्हणून गोकुळ शिरगावमधील संघाच्या जागेच्या जागेवर पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय झाला. भारत पेट्रोलियमने त्यासाठी दोन कोटींच्या गुंतवणुकीला होकारही दिला आहे.
मुंबईत आणखी एका जागेची चाचपणी
मुंबईतच सध्या वाशीमध्ये असलेल्या गोकुळच्या जागेलगतच आणखी एक जागा असून, रोजचे १० लाख लिटरचे पॅकेजिंग करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी २० कोटी लागणार असल्याने सिडकोबरोबरच या पर्यायी जागेचीही चाचपणी करावी, असाही बैठकीत सूर होता. दरम्यान, गोकुळने मुंबईत दूध विक्रीवर लक्ष केंद्रित असून मार्केटिंगवर अधिक भर दिला आहे. त्यासाठी तेथील सर्व्हे करून जाहिराती कशाप्रकारे करायचे याचे सादरणीकरण मुंबईतील कंपनीने संचालक मंडळासमोर केले.