आता ‘भाजता’ला टक्कर देण्यासाठी ‘हसशि’ प्रयोग

By admin | Published: January 23, 2017 12:12 AM2017-01-23T00:12:09+5:302017-01-23T00:12:09+5:30

जिल्हा परिषद रणांगण : लोकसभा डोळ्यांसमोर ठेवत जिल्ह्याचे राजकारण

Now, 'Hasashi' experiment is used to fight 'Bharat' | आता ‘भाजता’ला टक्कर देण्यासाठी ‘हसशि’ प्रयोग

आता ‘भाजता’ला टक्कर देण्यासाठी ‘हसशि’ प्रयोग

Next



कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य आणि ताराराणी आघाडी असा ‘भाजता’चा प्रयोग जिल्ह्यात रंग भरत असताना दुसरीकडे याला छेद देण्यासाठी हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि शिवसेना अशी ‘हसशि’ कल्पना आकार घ्यायला सुरुवात झाली आहे. पुढची लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून आतापासूनच या जोडण्या सुरू झाल्या असल्याने आगामी काळात टोकदार राजकीय संघर्ष पाहावयास मिळणार आहे.
दोन वेळा खासदारकीने हुलकावणी दिलेल्या धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर दिल्ली गाठल्यानंतर विधानसभेला मात्र त्यांच्यासह महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटील यांना चितपट करीत जिल्ह्याचे राजकारण नव्या वळणावर आणून ठेवले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेवर आणण्यासाठी मंत्री पाटील यांनी महाडिक यांच्या ‘ताराराणी’ची साथ घेतली. मात्र, शिवसेनेचा धनुष्यबाण तिथे आडवा आला आणि सत्तेपासून भाजपला वंचित राहावे लागले. तिथे ‘हसशि’ प्रयोग पहिल्यांदा यशस्वी झाला.
आता जिल्हा परिषदेसाठी मंत्री पाटील यांनी भाजपची टीम कामाला लावत बाराही तालुक्यांतून हाकारे घालायला सुरुवात केली आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. समरजितसिंह घाटगे यांच्यापासून ते रणजितसिंह पाटील यांच्यापर्यंत आणि अरुण इंगवले यांच्यापासून डी. सी. पाटील यांच्यापर्यंत अनेकजणांनी आता ‘कमळा’चा स्कार्फ गळ्यात घातला आहे. विनय कोरे भाजपमध्ये गेले नसले तरी ते त्यांच्यासोबत आघाडीत गेले आहेत.
विधान परिषदेच्या घवघवीत यशाने सतेज पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांचा महाडिकविरोध टोकाचा होत असताना धनंजय महाडिक यांनीही मुश्रीफ यांना अंगावर घेण्यास सुरुवात केल्याने सतेज आणि मुश्रीफ यांची जवळीक आणखी घट्ट होणार आहे. आगामी लोकसभेसाठी धनंजय महाडिक यांना विरोध करण्यासाठी संजय मंडलिक हेच रिंंगणात असण्याची चिन्हे आहेत. मंडलिक यांना सतेज यांचा याआधीही पाठिंबा होता. मंडलिक कॉँग्रेसमध्ये असताना सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव अमल यांना डावलून मंडलिक यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले होते, हा इतिहास ताजा आहे. एवढेच नव्हे तर कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी ‘गेल्यावेळी चूक झाली; परंतु संजयला एकदा खासदार करायचे आहे,’ असा जाहीर निर्धार व्यक्त केला होता.
वडिलांचा हा निर्धार वास्तवात आणण्यासाठी सतेज पाटील यापुढील काळात अधिक आग्रही राहण्याची चिन्हे आहेत. म्हणूनच जिल्हा परिषदेत बहुमतासाठी आवश्यक असणारा ‘३४’चा जादूई आकडा गाठण्यासाठी नवी फिल्ंिडग लागण्याची चिन्हे आहेत. वेळ पडल्यास पाच वर्षे सत्तेत असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा उपयुक्त ठरू शकते; कारण ‘स्वाभिमानी’च्या उलट काम करणारे जिल्ह्यातील अनेकजण आता भाजपमध्ये जात आहेत. (प्रतिनिधी)
भाजप-शिवसेना जमणे अशक्य
गेल्या दोन वर्षांत भाजप-शिवसेनेने एकमेकांचा पंचनामा करण्याची एकही संधी सोडलेली नाही. जे मुंबईत सुरू आहे, तेच जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांनी ‘भाजप ही दोन हजार रुपयांची कधीही रद्द होईल अशी नोट असल्याची जहरी टीका शनिवारी (दि.२१) केली होती. म्हणूनच ‘भाजता’ला टक्कर देण्यासाठी ‘हसशि’ प्रयोगाची अंमलबजावणी अपरिहार्य ठरू शकते.

Web Title: Now, 'Hasashi' experiment is used to fight 'Bharat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.