कोल्हापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच, एनटीएतर्फे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रॅज्युएट (नीट-यूजी २०२४) साठी नीट २०२४ परीक्षा आज, रविवार दि. ५ मे २०२४ रोजी होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १३ केंद्रांवर ७३३३ वैद्यकीय विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
एनटीएच्या वरिष्ठ संचालक साधना पाराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार या परीक्षा केंद्रांची यादी जारी करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली होती. १२ देशांतील १४ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार असून संपूर्ण भारतातील ५५४ केंद्रांवर होणार आहे. देशातील २४ लाख वैद्यकीय विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. महाराष्ट्रातील २ लाख ७९ हजार ९०४ विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत. दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार असून दुपारी १.३० वाजता परीक्षा हॉलमध्ये प्रवेश बंद केला जाणार आहे.प्रवेशपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे सकाळी ११.०० वाजताच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य केले आहे.२०० प्रश्नांपैकी विद्यार्थ्याला १८० एमसीक्यू सोडवणे गरजेचे आहे. एनटीएकडून एडमिट कार्ड जारी झाल्यावर पहिल्याच दिवशी डाऊन लोड होत नव्हते, झाले तरी विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती येत नव्हती, तकार केल्यावर दुसऱ्या दिवशी सर्व्हर सुरळीत झाला. ४×६ चा पोस्टकार्ड साईज फोटो चिकटवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही, तसेच पासपोर्ट साईज फोटो लावण्यासाठी सुद्धा जागा अपुरी आहे, अशा कांही त्रुटी राहिल्या आहेत. दरम्यान, केंद्रावरती मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन ठेवणे बाबत काही विद्यार्थ्यांनीना हायकोर्टात जावे लागले.