लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिबिरामध्ये रक्तदात्याला वस्तूचे आमिष दाखवून रक्त संकलन केल्याबद्दल येथील लक्ष्मीपुरीतील अर्पण ब्लड बँकेचा परवाना सोमवारपासून तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. औषध व सौंदर्यप्रसाधने कायद्यानंतर्गत ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.लक्ष्मीपुरीतील सरोज अपार्टमेंटमध्ये यशोदर्शन सामाजिक विकास मंडळ संचलित अर्पण ब्लड बँकेचे कार्यालय आहे. जानेवारी २०१९ मध्ये अर्पण ब्लड बँकेच्यावतीने हुपरीमध्ये रक्तसंकलन करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी ‘रक्तदान करणाऱ्यास सॅक फ्री’ अशी पोस्टरवर जाहिरातबाजी करण्यात आली होती. याबाबत काहींनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. रक्तदात्याला आमीष दाखवून रक्त संकलन केल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने तत्कालीन औषध निरीक्षक शामल मैंदरकर, औषध निरीक्षक महेश गावडे आणि सीपीआरमधील जिल्हा रक्त संकलन अधिकारी डॉ. राजेंद्र मदने यांनी चौकशी केली. रक्तदात्यांकडेही चौकशी करण्यात आली. त्यामुळे तक्रारीत तथ्य आढळल्याने अर्पण ब्लड बँकेस खुलासा करण्याची नोटीस पाठविली पण त्यांच्याकडून खुलासा समाधानकारक आला नाही. त्यामुळे पुणे औषध विभागाचे सह.आयुक्त एस. बी. पाटील यांच्या आदेशानुसार औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत अर्पण ब्लड बँकेचा परवाना सोमवारपासून तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. हा कारवाईचा आदेश औषध निरीक्षक महेश गाडेकर यांनी बजावला.--------------