दीड महिन्यात सव्वा लाख वाहने फास्टॅगविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 05:35 PM2021-02-16T17:35:58+5:302021-02-16T17:39:53+5:30
Fastag Toll -गेल्या दीड महिन्यात किणी टोलनाक्यावरून १ लाख १८ हजार ७५१, तर तासवडे टोलनाक्यावरून १ लाख २९ हजार २२९ वाहने रोख मार्गिका अर्थात फास्टॅगविना गेली आहेत. या टोलनाक्यावर मध्यरात्रीपासून तीन मार्गिका फास्टॅग, तर एक हायब्रिड मार्गिका सुरु झाली आहे. ज्या वाहनांना फास्टॅग नसेल, त्यांना मध्यरात्रीपासून दुप्पट टोल आकारला जाणार आहे.
कोल्हापूर : गेल्या दीड महिन्यात किणी टोलनाक्यावरून १ लाख १८ हजार ७५१, तर तासवडे टोलनाक्यावरून १ लाख २९ हजार २२९ वाहने रोख मार्गिका अर्थात फास्टॅगविना गेली आहेत. या टोलनाक्यावर मध्यरात्रीपासून तीन मार्गिका फास्टॅग, तर एक हायब्रिड मार्गिका सुरु झाली आहे. ज्या वाहनांना फास्टॅग नसेल, त्यांना मध्यरात्रीपासून दुप्पट टोल आकारला जाणार आहे.
केंद्र सरकारने देशातील सर्व टोलनाक्यांवरून जा-ये करणाऱ्या चारचाकी वाहनांना टोल भरणा रोखीऐवजी फास्टॅगच्या माध्यमातून ई-पेमेंट भरणा करणे बंधनकारक केले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम ३१ डिसेंबर २०२० ही तारीख निश्चित केली होती.
सर्वच ठिकाणी लाखो वाहनधारकांनी हे फास्टॅग कोड घेतले नव्हते. या कारणावास्तव १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ केंद्र शासनाने दिली होती. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून टोल नाक्यांवर फास्टॅग कोड स्टीकर नसेल तर त्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कोल्हापूर विभागांतर्गत किणी टोलनाक्यावरून रोज १९ हजार ६४७ वाहने ये-जा करतात. त्यापैकी १५ हजार ७४२ वाहने फास्टॅग, तर ३ हजार ९०५ वाहने विना फास्टॅग अर्थात रोख टोल भरून जात होती. अशीच परिस्थिती तासवडे टोलनाक्यावरही आहे.
यात अनुक्रमे रोज २१ हजार ७६० वाहने ये-जा करतात. त्यापैकी १७ हजार ७६९ वाहने फास्टॅगद्वारे, तर ३ हजार ९९१ वाहने विना फास्टॅग जात होती. सोमवारी मध्यरात्रीपासून या दोन्ही टोलनाक्यांवरील मार्गिकांमधील तीन मार्गिका पूर्णपणे फास्टॅग, तर एक मार्गिका हायब्रीड अर्थात रोख आणि फास्टॅग अशी केली आहे. जे टोल रोख भरतील त्यांना दुप्पट टोल आकारला जाणार आहे.
दीड महिन्यातील स्थिती अशी,
- टोलनाका फास्टॅग ई-पेमेंट रोखीत भरणा (फास्टॅगविना)
- किणी (वाहन संख्या ५ लाख ७३ हजार २४६ ६ हजार ६४ १ लाख १८ हजार ७५१
- तासवडे (वाहन संख्या) ६ लाख ४१ हजार ४१८ ६ हजार १३९ १ लाख २९ हजार ५५०
मध्यरात्रीपासून किणी व तासवडे टोलनाक्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य केला आहे. ज्या वाहनांनी फास्टॅग काढला नसेल त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. त्याकरिता तीन लेन फास्टॅग, तर एक लेन हायब्रीड केली आहे.
- चंद्रकांत बर्डे,
नोडल अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण