कोल्हापूर : गुजरीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांचा पाठलाग केला. मात्र, ते सर्वजण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्या दोन कार पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या प्रकरणातील संशयित सुशांत पवार (रा. मंगळवार पेठ) याला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व कोयता जप्त करण्यात आला.याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, २० मे रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम व गुन्हेशोध पथकातील कर्मचारी रात्री गस्त घालत होते. रेल्वे फाटकाच्या परिसरात दोन चारचाकी वाहने संशयितरीत्या फिरत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता कार रस्त्याकडेला थांबवून संशयितांनी पळ काढला.
या पळालेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके नेमली होती. शुक्रवारी पहाटे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तावडे हॉटेल परिसरात गस्त घालत होते. त्या दरम्यान पोलिसांनी संशयित सुशांत पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मकरंद गोंधळी या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मदतीने अमित धुंदरे व मी स्वत: दरोड्याच्या तयारीत होतो, असे त्याने सांगितले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर व कोयता पोलिसांनी हस्तगत केला.