कांदा भडकला, कोथिंबीर आवाक्यात, रताळ्यांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:41 PM2020-10-19T17:41:30+5:302020-10-19T17:44:41+5:30
vegetable, market, kolhapur अनलॉकअंतर्गत निर्बंध शिथिल केल्यानंतर पाच महिन्यांनंतर रविवारी लक्ष्मीपुरीचा आठवडा बाजार भरला. पहिल्याच दिवशी बाजार हाऊसफुल्ल झाला. दसऱ्याच्या निमित्ताने फळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, खरेदीसाठीही झुंबड उडाली आहे. रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या दराने पन्नाशी ओलांडली आहे.
कोल्हापूर : अनलॉकअंतर्गत निर्बंध शिथिल केल्यानंतर पाच महिन्यांनंतर रविवारी लक्ष्मीपुरीचा आठवडा बाजार भरला. पहिल्याच दिवशी बाजार हाऊसफुल्ल झाला. दसऱ्याच्या निमित्ताने फळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, खरेदीसाठीही झुंबड उडाली आहे. रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या दराने पन्नाशी ओलांडली आहे.
पावसामुळे भाजीपाला कुजल्याने बाजारात टंचाई आहे. तरीदेखील खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. पालेभाज्या कमी प्रमाणात दिसत असून, दरही चढेच आहे. मेथी २५ ते ३० रुपये पेंढी आहे, कोथिंबीरचे दर आवाक्यात आले असून, ३० रुपयांची पेंढी आता १० ते १५ रुपयांवर आली आहे. उपवासासाठी रताळ्यांची मागणी वाढल्याने दरही ३० ते ४० रुपये किलोवर स्थिर आहेत. कांदा ५० ते ६०, लसूण १२०, बटाटा ४० रुपये किलो असा भाव आहे.
धान्यबाजार वधारला
सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने धान्य, कडधान्यांची मागणी वाढते, दरही वाढतात. त्याची सुरुवात बाजारात दिसत आहे. तांदूळ २५ ते ७५ रुपये किलो आहे. ज्वारी ४० ते ५६ रुपये, गहू ३० ते ३८ रुपये आहे. कडधान्यामध्येही दरात वाढच आहे. हरभरा डाळ ७० रुपयांवर स्थिर आहे. मटकी १११०, मसूरा व मसूर डाळ ८०, चवळी ८०, मूग डाळ १०० असे दर चढतच आहेत.
भाजीपाला कडाडला
भाजीपाल्याचे दर ८० ते १२० रुपयांवर गेले आहेत. वांगी, दोडका १२० भेंडी, बिन्स, वरणा, कारली ८० रुपये किलो आहेत. टोमॅटो ४० रुपये किलो आहेत. काकडी ३० रुपये किलो आहे. कडीपत्ता, पुदीना १० रुपये पेंढी आहे. फ्लावर ३० ते ५० रुपये नग आहे.
फळ बाजारात स्वस्ताई
भाजीपाला, धान्यात महागाईने टोक गाठलेले असताना त्या तुलनेत फळबाजारात काहीशी स्वस्ताई नांदत आहे. सफरचंद, डाळिंब, मोसंबी ८० रुपये किलो, केळी २० ते ४० रुपये डझन, चिकू ४० रुपये किलो असा दर आहे.
धान्य बाजारात आवक कमी आहे. दरात चढउतार आहेत. आता सणावारामुळे मागणी वाढू लागली आहे.
अनिल महाजन,
धान्य व्यापारी
पाच महिन्यांपासून आठवडा बाजार बंद असल्याने भाजी विक्रीवर मर्यादा होत्या. आता बाजार सुरू झाल्याने भाजी विक्री सुरू केली आहे. घर चालविण्यापुरते पैसे मिळणार असल्याने आनंदी आहे.
- आदम मुजावर,
भाजी विक्रेता
मी पन्हाळ्याहून भाजी विक्रीसाठी आले आहे. मूळचे बंगळूरचे; पण आम्ही शेतात जंगली वांगे लावले आहे, त्याच्या विक्रीसाठी आले आहे.
सन्मती कांबळे,
पन्हाळा